TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
करण जोहरने वाढदिवशी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; रोमॅंटिक सिनेमानंतर आता करणार अॅक्शनपट
बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक करण जोहर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. करण जोहरने आज खास पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. करणचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान करणने वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी सिनेमासंदर्भात माहिती दिली आहे.
100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार भूल भुलैय्या-2?
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. केवळ पाच दिवासांमध्ये या चित्रपटानं 76 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले तरी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमात तारा सुतारिया आणि नवाजु्द्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'झॉलीवूड'चा ट्रेलर रिलीज
झाडीपट्टी नाटकाची धमाल दाखवणाऱ्या 'झॉलीवूड' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त 'झॉलीवूड' हा सिनेमा 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे. पहिल्यांदाच झाडीपट्टी नाटकाचं खरंखुरं चित्रण या सिनेमात मांडण्यात आलं आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात
17 वा 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' येत्या 29 मे पासून सुरू होत आहे. हा महोत्सव 29 मे ते 5 जून दरम्यान पार पडणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक बिग बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. अशातच आता चित्रपट महोत्सवालादेखील सुरुवात झाली आहे. कान्स चित्रपट महोत्सवालादेखील सुरुवात झाली आहे. कान्स चित्रपट महोत्सव झाल्यानंतर लगेचच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे.
‘मीडियम स्पाइसी’चा ट्रेलर रिलीज
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. लवकरच त्याचा ‘मीडियम स्पाइसी’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये एका शेफच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. मीडियम स्पाइसी या चित्रपटामध्ये ललित हा एका शेफची भूमिका साकारणार आहे. तर प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे या देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
दिशा वकानी दुसऱ्यांदा झाली आई; दिला मुलाला जन्म
छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री दिशा वकानी आता दुसऱ्यांदा आई झाली आहे. दिशा आणि तिचा मयूर पाडिया यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. दिशा यांच्या भावानं म्हणजेच मयूर वकानीनं याबाबत माहिती दिली आहे. मयूर हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये सुंदरलाल ही भूमिका साकरतो. त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला आनंद होत आहे कारण मी पुन्हा मामा झालो आहे. 2017 मध्ये दिशानं मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता ती पुन्हा आई झाली आहे. मला खूप आनंद होत आहे.'
'रानबाजार' ला प्रेक्षकांची पसंती; नवा भाग 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
‘रानबाजार’चे 3 भाग 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या तिन्ही भागांनी अक्षरशः खळबळ माजवली आहे. यातील तिसरा भाग अशा एका रंजक वळणावर येऊन थांबला आहे, जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, ती पुढील भागांची. मात्र प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक न ताणता 'रानबाजार'चे पुढील भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी झळकणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असणाऱ्या या वेबसीरिजची भव्यता यापूर्वी क्वचितच वेबविश्वात अनुभवण्यास आली असेल.
'केजीएफ'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! 2025 मध्ये येणार तिसरा भाग?
'केजीएफ' सिनेमाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 2018 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 14 एप्रिल 2022 ला या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'तू आणि मी, मी आणि तू' सिनेमाचे पोस्टर रुपाली चाकणकरांच्या हस्ते झाले रिलीज
बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येकव्यक्तीला एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे हे सोप्प वाटणार प्रेम अजिबात नाही त्यात येणारी वादळे कधी दिशा भरकटवतील हे सांगणाऱ्या 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' या मराठी सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.