TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र'चा प्रदर्शनाआधी असाही विक्रम


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या  'ब्रम्हास्त्र'  सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. अयान मुखर्जीच्या  बहुप्रतीक्षित 'ब्रम्हास्त्र' सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच एक विक्रम केला आहे. वॉल्ट डिस्ने स्टुडिओ पिक्चर्सच्या ग्लोबल रिलीज कॅलेंडरमध्ये स्थान मिळवणारा हा भारतातील पहिला सिनेमा ठरला आहे. 


‘आनंद दिघे हेच खरे दबंग’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळतेय, ती म्हणजे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’सिनेमाची. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते. दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले,"आनंद दिघे हेच खरे दबंग". 


हिंदी भाषेच्या वादानंतर आता आयुष्मानच्या 'अनेक' चित्रपटामधील सीन व्हायरल


गेल्या काही दिवसांपासून 'राष्ट्रभाषा' या विषयाबाबत  सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अभिनेता अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेता किच्चा यांच्यामध्ये हिंदी भाषेवरून ट्विटर वॉर सुरू होतं. आता नुकताच अभिनेता आयुष्मान खुरानाच्या  'अनेक' या चित्रपटामधील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीनमध्ये हिंदी भाषेबद्दलचे डायलॉग आयुष्मान म्हणताना दिसतोय. 


महेश टिळेकरांची पोस्ट चर्चेत


मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर  हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. वेगवेगळ्या विषयांवरील मतं हे सोशल मीडियावर पोस्टद्वारे महेश टिळेकर  मांडत असतात. नुकताच एक व्हिडीओ महेश यांनी शेअर केला. या व्हिडीओमध्ये एक चित्रपटगृह दिसत आहे. व्हिडीओला महेश टिळेकर यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


आनंद दिघे 'झुकेंगा नही साला' असे होते : उद्धव ठाकरे


'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ट्रेलर लॉंचच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते. तसेच अभिनेता रितेश देशमुख आणि सलमान खान यांनी देखील विशेष उपस्थिती लावली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, 'आनंद दिघे हे 'झुकेंगा नही साला' असे होते. 


भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत


भोंगा आणि हनुमान चालिसा वाद सध्या देशभरात चर्चेत आहे. यावर अनेक नेते सध्या या विषयावर त्यांची मतं मांडत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. देशात सुरू असलेल्या या वादामुळे सोनू सूदला प्रचंड दु:ख होत आहे. 


जगभरात ‘रॉकी भाई’चा डंका!


सुपरस्टार यशचा चित्रपट 'केजीएफ 2' जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'KGF 2'च्या हिंदी व्हर्जनने नुकताच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केला आहे. आता या चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड कलेक्शननेही रेकॉर्ड केला आहे. यशच्या 'KGF Chapter 2' या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 


मराठी सिनेसृष्टीत सैनिकांसाठी प्रथमच चित्रपटाच्या प्रिमिअर शोचे आयोजन


मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे'. नुकताच हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. राजवीरसिंहराजे गायकवाड, देवांशी सावंत यांच्यासह या चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी आणि नम्रता साळोखे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रत्येक देशप्रेमीसाठी असला तरी हा चित्रपट सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा प्रिमिअर शो बेळगाव येथे सैन्य अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आला होता. मराठी सिनेसृष्टीत असे प्रथमच घडत आहे. 


‘मायलेक’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मातृदिनाचे खास निमित्त साधत सोनाली खरे हिने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली असून या प्रॅाडक्शन हाऊस अंतर्गत ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई आणि मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे.


कॉमेडियन मुनव्वर फारूकी ठरला कंगनाच्या लॉकअपचा विजेता


कंगना रनौतच्या लॉकअपचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा लॉक अप कार्यक्रमाचा विजेता ठरला. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता.