Tiku Talsania Brain Stroke : प्रसिद्ध विनोदी अभिनेता टिकू तलसानिया यांना ब्रेन स्टोक आला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती शनिवारी मीडिया रिपोर्टनुसार समोर आली होती. मात्र, आता त्यांच्या पत्नीने त्यांच्या तब्येतीबद्दलची माहिती दिली आहे. यानुसार, टिकू तलसानिया यांना शनिवारी ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
अभिनेता टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक
अभिनेता टिकू तलसानिया यांची शनिवारी अचानक तब्येत बिघडली.सुरुवातीला असे म्हटले जात होते की अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता. पण आता टिकू तलसानियाच्या पत्नीने सांगितलं आहे की, अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला नव्हता तर ब्रेन स्ट्रोक आला होता.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी अचानक तब्येत बिघडली
टिकू तलसानिया यांची पत्नी दिप्ती तलसानिया यांनी सांगितलं की, ते एका चित्रपपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेले होते, जिथे रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम
टिकू तलसानिया यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केलं आहे. त्यांनी आमिर खानसोबत 'अंदाज अपना अपना' आणि शाहरुख खानसोबत 'देवदास' या चित्रपटात काम केले आहे. अलिकडेच ते 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामध्येही झळकले होते. त्यानंतर गेल्या काही काळापासून त्यांना त्यांच्या आवडीचे काम मिळत नसल्याने ते चिंतेत असल्याची माहिती आहे.
'या' चित्रपटांमध्ये झळकले
टिकू तलसानिया अनेक दशकांपासून प्रेक्षकांना हसवण्याचं काम करत आहेत. ते सध्या 70 वर्षांचे आहेत. चार दशकांच्या कारकीर्दीत टिकू तलसानिया यांनी 'देवदास', 'जोडी नंबर वन', 'शक्तिमान', 'कुली नंबर 1', 'राजा हिंदुस्थानी', 'जुडवा', 'प्यार किया तो डरना क्या' अशा शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे.