मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशनने 'पद्मावती'ला प्रमाणपत्र नाकारलं. अर्थात हा नियम काही आजचा नाही. पार 1952 पासून तो सेन्सॉरच्या पुस्तिकेत पडून होता. पण 'पद्मावती'ने मात्र त्याला नवसंजीवनी दिली. बोर्डाच्या वेबसाईटच्या होमपेजवर तो दिमाखात झळकू लागला.


इकडे हा नियम नव्याने जागा झाला आणि 'पद्मावती'च्या भवताली असलेल्या हिंदी-मराठी सिनेमांच्या पोटात गोळा आला. आता आपलंही काही खरं नाही या भावनेने अंकुशच्या 'देवा'पासून सल्लूच्या 'टायगर'पर्यंत सगळे भैसाटून गेले.

सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करुन, थिएटरचं बुकिंग करुन मग निर्माते सेन्सॉरच्या दारात जायचे. हीच सवय आता अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याचा सगळ्यात मोठा फटका 22 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या 'टायगर जिंदा है' या सिनेमाला बसू शकतो. कारण अजूनही या सिनेमाचं काम सुरुच आहे. सलमान खानसारखा ब्रँड या सिनेमात असल्याने त्याच्यापुढे बोर्ड झुकणार का? उशिरा एन्ट्री करुनही टायगरला सर्टिफिकेट मिळणार का याची उत्तरं सर्वांनाच हवी आहेत.

केवळ टायगरच नाही तर त्या आधी रिलीज होणारे फुकरे रिटर्न्स, नवाजुद्दीनचा मान्सून शूटआऊट, टायगर श्रॉफचा मुक्काबाज अशा अनेक सिनेमांचे निर्माते सध्या त्याच टेन्शनमध्ये आहेत.

मराठीत काही वेगळी परिस्थिती नाही. एक डिसेंबरला रिलीज होणारा 'देवा' सिनेमा अजूनही सेन्सॉर सर्टिफिकेटच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सर्व चित्रपटांच्या निर्मात्यांना होल्डवर ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर 5 जानेवारीला रिलीज होणाऱ्या संजय जाधवच्या 'ये रे ये रे पैसा'चाही परिस्थिती काही वेगळी नाही.

धक्कादायक बाब म्हणजे असे तब्बल 110 सिनेमे सध्या सेन्सॉरच्या सर्टिफिकेटसाठी रांगेत उभे आहेत. इकडे तापलेली हवा बघता, सेन्सॉरच्या
ऑफिसमोरही पोलिस व्हॅन्स तैनात करण्यात आल्या आहेत. सर्टिफिकेटसाठी कोणाही कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असा फतवाच बोर्डाने काढला आहे.

त्यामुळे साऱ्यांचेच डोळे आता सेन्सॉरच्या भूमिकेकडे लागले आहेत. लवकरच बोर्डाची मिटिंग होणं अपेक्षित असून त्यात काय निर्णय लागतो याकडे अवघी इंडस्ट्रीच्या नजरा लागून आहेत.