फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2017 02:19 PM (IST)
'इफ्फी'मधील ब्रिक्स देशांमधील पुरस्कार प्राप्त चित्रपट यंदा दाखवले जाणार आहेत. त्यात भंडारकर यांची 'मुंबई मिस्ट' ही शार्टफिल्म दाखवली जाणार आहे.
पणजी : 'पद्मावती' सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेल्या वादात आता दिग्दर्शक-निर्माते मधुर भंडारकर यांनी उडी घेतली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'वर जशी वेळ आली होती, तशीच वेळ माझ्यावर 'इंदू सरकार'वर आली होती. पण त्यावेळी माझ्या मागे कोणी उभे राहिले नाहीत. फिल्म इंडस्ट्री ही आपमतलबी आहे, स्वतःवर संकट आले की सगळ्यांनी आपल्या मागे उभे रहावे असे प्रत्येकाला वाटत असते अशा शब्दात भंडारकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आपमतलबी लोकांचे कान उपटले आहेत. 'इफ्फी'मधील ब्रिक्स देशांमधील पुरस्कार प्राप्त चित्रपट यंदा दाखवले जाणार आहेत. त्यात भंडारकर यांची 'मुंबई मिस्ट' ही शार्टफिल्म दाखवली जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भंडारकर बोलत होते. भंडारकर म्हणाले, 'पद्मावती'वर आली तशी वेळ यापूर्वी देखील अनेक चित्रपटांवर आलेली आहे. 'इंदू सरकार'वेळी माझ्यावर सुद्धा अशीच वेळ आली होती. मात्र त्यावेळी फारच कमी लोकांची मला साथ मिळाली होती. जेव्हा एखादा निर्माता एवढी मेहनत घेऊन चित्रपट बनवतो. तेव्हा तो प्रदर्शित व्हायला हवा. 'पद्मावती'सुद्धा प्रदर्शित व्हायला हवा. सध्या हे प्रकरण सीबीएफसीकडे असून त्याची सूत्र प्रसून जोशी यांच्यासारख्या जाणकार व्यक्तीकडे असल्याने ते यातून निश्चितच समाधानकारक मार्ग काढतील, अशी अपेक्षा भंडारकर यांनी यावेळी व्यक्त केली. ऐतिहासिक संदर्भ घेऊन चित्रपट बनवताना अलीकडे खूपच काळजी घ्यावी लागते. समाजातील काही घटकांकडून त्याला विरोध होत असतो. त्यामुळे निर्मात्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगून भंडारकर म्हणाले, जे बुद्धिजीवी एरव्ही इन टॉलरेन्सवर बोलतात ते माझ्या 'इंदू सरकार'वेळी गप्प का होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.