पणजी (गोवा) : संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे, असं सांगतानाच आधी सिनेमा बघा त्यानंतर त्याचा विरोध करा, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं. गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीच्या सोहळ्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.


“संजय लीला भन्साळी कसे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचा ‘बाजीराव मस्तानी’ बाकीच्यांना आवडला असेल, पण मला नाही. गरजेचं नाही की, ठप्पा लावलेले सर्वच सिनेमे आवडतील.”, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी संजय लीला भन्साळींचा समाचार घेतला.

गोव्यात सुरु असलेल्या ‘इफ्फी’ सोहळ्यावेळी सिनेमाप्रेमींशी ते संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळींसह अनेक मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला.

कुणी उगाच कुणाला टार्गेट करत नाही. मीही कलाकार आहे. कलाकार आणि दिग्दर्शकाची स्वत:ची एक जबाबदारी असते, ती ओळखून काम करायला हवे, असे मत नानांनी मांडले.

“आपण कुणाला आयुष्य देऊ शकत नाही, मग कुणाचा जीव घेण्याचा अधिकारही आपल्याला नाही. त्यामुळे ‘पद्मावती’ सिनेमाच्या विरोधासाठी नाक, डोळे कापण्याची भाषा योग्य नाही.”, असे म्हणत त्यांनी ‘पद्मावती’ सिनेमाबाबत समर्थनही दिले.

पाहा व्हिडीओ :