पुणे : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी पुण्यातल्या अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. परंतु पुण्याच्या औंध येथील सिने पोलीस मल्टीप्लेक्समधला ‘ठग्स...’ चा शो अचानक शो रद्द करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. अनेक प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्सच्या आवारात गोंधळ घातला. मल्टीप्लेक्समधील कर्चाचाऱ्यांना शिवीगाळही केली. त्यामुळे मल्टीप्लेक्सच्या आवारात तणाव निर्माण झाला होता.


औंध येथील वेस्टएंड या मॉलमधील सिने पोलीस मल्टीप्लेक्समध्ये सकाळी 9.15 वाजताचा ‘ठग्स...’ चा शो आयोजित करण्यात आला होता. परंतु 10 वाजले तरिही शो सुरू झाला नाही, त्यामुळे प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. दिवाळीची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक शोसाठी आले होते. त्यामुळे या मोठ्या गर्दीला आवरणे मल्टीप्लेक्स कर्मचाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे प्रेक्षकांनी अधिक गोंदळ केला.

शो सुरु करण्यात तांत्रिक अडचण आल्याचे सांगून सुरुवातीला मल्टीप्लेक्स अधिकाऱ्यांनी प्रेक्षकांकडून थोडा वेळ मागून घेतला होता. परंतु असे तीन वेळा सांगून प्रेक्षकांना पाऊण तास थांबवून ठेवले. त्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्याला शो सुरू करता येणार नाही. असे सांगितल्यानंतर प्रेक्षक चिडले व त्यांनी गोंधळ घातला. तसेच काही प्रेक्षकांनी शिवीगाळही केली.