मुंबई : मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर. त्यांच्या आयुष्यावर आधारित 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' हा बहुप्रतीक्षित चित्रपट उद्या (गुरुवार 8 नोव्हेंबर) प्रदर्शित होत आहे. रीलिजच्या आदल्याच दिवशी 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल..' या प्रसिद्ध लावणीचं 'आणि डॉ. काशिनाथ..' चित्रपटातील नवीन रुप लाँच करण्यात आलं आहे.


'पिंजरा' चित्रपटात दिग्गज अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि अभिनेत्री संध्या यांच्यावर चित्रित झालेल्या 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल..' या लावणीचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनावर आहे. याच गाण्याचं नवीन रुपडं साकारण्याचं शिवधनुष्य 'आणि डॉ. काशिनाथ..' चित्रपटाच्या टीमने पेललं आहे. प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन या गाण्यात लागूंच्या भूमिकेत आहे, तर प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकरने संध्या यांची भूमिका वठवली आहे.

प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.

कोण कोणत्या भूमिकेत

डॉ. काशिनाथ घाणेकर - सुबोध भावे
मास्टर दत्ताराम - सुहास पळशीकर
वसंत कानेटकर - आनंद इंगळे
सुलोचना दीदी - सोनाली कुलकर्णी
डॉ. श्रीराम लागू - सुमित राघवन
भालजी पेंढारकर - मोहन जोशी
प्रभाकर पणशीकर - प्रसाद ओक
इरावती घाणेकर - नंदिता पाटकर
कांचन घाणेकर - वैदेही परशुरामी