मुंबई : झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा आगामी दोन वर्षात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या या तिन्हीही सिनेमांची निर्मिती प्रक्रिया सुरु असून 2018 आणि 2019 मध्ये हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील.


अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर लवकरच मराठी सिनेमा बनणार आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजा 'छत्रपती शिवाजी' या सिनेमाची निर्मिती करणार करणार असून विशेष म्हणजे रितेश देशमुख यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमाचं बजेट किती?

छत्रपती शिवरायांवरील या मराठी सिनेमाचं बजेट 200 कोटींपेक्षा जास्त असेल, असं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर रितेशचा दिग्दर्शक मित्र राम गोपाल वर्मानेही छत्रपती शिवाजी या सिनेमाचं बजेट 225 कोटी असेल असं ट्विट केलं होतं.

त्याबाबत बोलताना रितेश म्हणाला, “सध्या तरी सिनेमाचा स्क्रीनप्ले/पटकथा निश्चित झाली आहे. आता सिनेमाचं प्री प्रॉडक्शनचं काम सुरु होईल. त्यानंतर सिनेमाचं बजेट ठरवलं जाईल”

तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय देवगण

अभिनेता अजय देवगणने 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात अजय देवगणच तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसेल. 2019 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

'लोकमान्य एक युगपुरुष' या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

तानाजी मालुसरे यांचं "आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेलं वाक्य सर्वांच्याच परिचयाचं आहे. भारताच्या दैदीप्यमान इतिहासात तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं आहे. त्‍यांच्‍या जाण्‍याने छत्रपती शिवरायही हळहळले होते आणि ‘गड आला पण माझा सिंह गेला' असे भावनिक उद्गार काढले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पदड्यावर पाहायला मिळणार आहे.

मणिकर्निका : द क्वीन ऑफ झांसी

झाशीची राणी लक्ष्मीबाईंची शौर्यगाथाही 2018 मध्ये मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. दिग्दर्शक क्रिश या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. अभिनेत्री कंगना रणावत झाशीच्या राणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या :

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर


तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके


छत्रपतींची प्रतिष्ठा जपायची आहे : रितेश देशमुख


बाहुबलीनंतर रितेशचा भव्यदिव्य ‘शिवाजी’, राम गोपाल वर्मांकडून ट्विटरवरुन कौतुक  


युगपुरुष ‘छत्रपती शिवाजी’ लवकरच मोठ्या पडद्यावर, जेनेलिया-रितेशचा मेगा प्लॅन