मुंबई : येत्या 15 ऑक्टोबरपासून केंद्राने 50 टक्के प्रेक्षक संख्येसह इतर नियम अटी देऊन चित्रपटगृहे खुली करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी केंद्राने दिली असली तरी अद्याप महाराष्ट्र सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात थिएटर्स बंद असतील. असं असलं तरी उर्वरित भारतात जिथे थिएटर्स खुली होतील तिथे गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची तयारी काही निर्मात्यांनी चालवली आहे. हे बळ त्यांना दिलं ते अर्थात ओटीटी व्यासपीठांनी.
अनेक चित्रपट लॉकडाऊन लागण्यापूर्वी थिएटरवर लागले. यात वॉर, तान्हाजी-द अनसंग वॉरिअर, थप्पड, मलंग या सिनेमाचा समावेश होतो. यातले अनेक चित्रपट थिएटरवर गाजले. यात तान्हाजी, थप्पड यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. इतर चित्रपटांना थिएटरवर समाधानकारक प्रतिसाद होता. पण लॉकडाऊन लागल्यानंतर यातले अनेक चित्रपट टीव्हीवर आले. टीव्हीवर आल्यानंतर त्या त्या चॅनलनी आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे सिनेमे आणले. तिथे त्यांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. उदाहरणार्थ, मलंग हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यात दिशा पटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू, अमृता खानविलकर अशी मंडळी होती. हा सिनेमा थिएटरवर पडला तरी ओटीटीवर तो तुफान चालला. इतका की लॉकडाऊन काळातच मलंगचा दिग्दर्शक मोहित सुरीने याच्या पुढच्या भागाची जुळवाजुळव सुरु केली. थप्पड हा अनुभव सिन्हा दिग्दर्शित चित्रपटही बराच वाखाणला गेला. वॉर, शुभमंगल ज्यादा सावधान हे चित्रपटही आता पुन्हा एकदा लॉकडाऊन रिबूटनंतर पुन्हा प्रदर्शित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
सुशांत सिंह राजपूतची केदारनाथही प्रदर्शित होणार
अनेक चित्रपट आता पुन्हा एकदा थिएटरवर वर्णी लावणार आहेत. यात याआधी पीएम नरेंद्र मोदी, खालीपिली या चित्रपटांनी हे जाहीर केलं आहेच. आता इतर चित्रपटांप्रमाणेच सुशांतसिंह राजपूत, सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला केदारनाथ हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुशांतबद्दल भारतभरात उसळलेली लाट लक्षात घेऊन त्याला आदरांजली म्हणून हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मनोदय असल्याचं चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं.