मुंबई : प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या मुंबईतील घरात चोरीची घटना घडली आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात मिका सिंगच्या मॅनेजरने याबाबत तक्रार दाखल केली आहे. मिका सिंगच्या घरातून एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत.


मिका सिंगच्या जवळच्या सहकाऱ्याविरोधातच चोरीची तक्रार करण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे.

“रविवारी दुपारी चोरीची घटना घडली असून, त्याच वेळी मिका सिंगचा सहकारी त्याच्या घरात होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चोरी झाली असावी”, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संशयित चोर आर्टिस्ट असून, मिका सिंगसोबत गेल्या 14 वर्षांपासून काम करत आहे. पोलिसांनी या संशयिताचे नाव सांगितले नाही. मात्र मिका सिंग राहत असलेल्या बिल्डिंगमधील सीसीटीव्ही पोलिसांनी मिळवले. त्यामध्येच संशयित मिकाच्या घरात जाताना आणि बाहेर पडताना दिसत आहे.

मूळचा दिल्लीचा असलेला संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनाही याबाबत कळवून, त्यांची मदत घेण्याचेही ओशिवरा पोलिसांनी ठरवले आहे.