मुंबईः टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाचं ट्रेलर तीन शहरात धोनीच्या हस्ते रिलीज होणार आहे. ट्रेलर लाँचिंगसाठी धोनी दिल्ली, मुंबई आणि जालंधर या तीन शहरांचा दौरा करणार आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे.

 

 

निर्मात्यांनी दिल्ली, मुंबई आणि जालंधर या तीन शहरात लाँचिंग कार्यक्रमाचं स्थळ अजून निश्चित केलेलं नाही. धोनी संपूर्ण देशासह जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे देशातील प्रमुख शहरात धोनीच्या हस्ते ट्रेलर लाँच करणं चांगली संधी असेल, असं सिनेमाचे दिग्दर्शक निरज पांडे यांनी सांगितलं.

 

 

'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाची उत्सुकता वाढतच चालली आहे. या सिनेमाची निर्मीती फॉक्स स्टार स्टुडिओद्वारा केली आहे. सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका निभावण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांची भली मोठी फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा येत्या 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.