Ekdam Kadak : 'एकदम कडक' (Ekdam Kadak) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. रोमँटिक आणि आशयघन अशा धाटणीचा 'एकदम कडक' हा सिनेमा 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे बनविले जातात. त्यातील काही सिनेमे समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीनने प्रेक्षकांचं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची एंट्री झाली आहे. या धाटणीच्या अंतर्गत येणारा आणि तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन अशा 'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. 


'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'एकदम कडक' या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संत तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे व अरबाज हा तरुण कलाकारांचा ग्रुप नव्याने मोठ्या पडद्यावर धुडगूस घालायला सज्ज झाला आहे. पोस्टर पाहता हे कॉलेजचे विद्यार्थी त्यांची कॉलेज लाईफ जगण्याचा मनमुराद आनंद घेतायत हे कळतेय, तर ही मुलं पाहत असणारी मुलगी नक्की कोण आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 




आकर्षक आणि आशयघन अशा या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात 'एकदम कडक' नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे येत्या 2 डिसेंबरला सिनेमागृहात पाहणे रंजक ठरेल. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे आहेत. 


'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच लागून राहिली असेल यांत शंकाच नाही. शिवाय पोस्टरवरील ती मुलगी कोण आहे याकडेही साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाण्यासाठी येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.