मुंबई : देश-विदेशात प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘द जंगल बुक’ सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 150 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाची आतापर्यंत भारतातील कमाई 160 कोटींच्या पुढे गेली आहे. 8 एप्रिलला हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला होता.

 

डिस्नेचा लाईव्ह-अॅक्शन अॅडव्हेंचर असलेल्या या सिनेमात एकच मानवी पात्र आहे, ते म्हणजे मोगलीचं. मोगलीची भूमिका चिमुकल्या नील सेठीने साकारली आहे.

 

नुकतंच डिस्नेने यूट्यूबवर एक व्हिडीओ जारी केला आहे. ‘द जंगल बुक’ सिनेमा कसा शूट केला, त्याबाबतचा हा मेकिंग व्हिडीओ आहे.

 

एक मानवी पात्र सोडलं तर या संपूर्ण सिनेमात फक्त आणि फक्त प्राणीच दिसतात. मात्र प्रत्यक्ष शुटिंगदरम्यान एकही प्राणी नव्हता. ग्राफिक्स/व्हीएफएक्सच्या मदतीने ‘द जंगल बुक’ शूट करण्यात आला.

 

मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किप्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित ‘जंगल बुक’ हे कार्टून जगभरात गाजलं होतं. त्यावरच आधारित 'द जंगल बुक' सिनेमा आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मोगलीने टेलीव्हिजन स्क्रीनवरुन सिनेमागृहातल्या मोठ्या पडद्यावर झेप घेतली.

 

या सिनेमाच्या हिंदी डबिंग व्हर्जनमध्ये प्रियंका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर, ओम पुरी, शेफाली शाह, नील सेठी यांचे व्हॉईस ओव्हर व्यक्तिरेखांना लाभले आहेत.

 

Making VIDEO: