लखनौ : उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी बॉलिवूड अभिनेता गोविंदावर खळबळजनक आरोप केला आहे. "गोविंदाने 2004च्या निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून मला पराभूत करण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि बिल्डर हितेन ठाकूरची मदत घेतली होती," असा दावा राम नाईक यांनी केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी 'चरैवति चरैवति' या आत्मचरित्रात हा दावा केला आहे. मराठीत असलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत 25 एप्रिल रोजी झालं होतं.

राम नाईक यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, "तीन वेळा खासदार राहिल्यानंतर आणि मुंबईसाठी बरंच काही केल्यानंतरही मी केवळ 11 हजार मतांनी पराभूत झालो. हा पराभव मी अजूनही पचवू शकलेलो नाही. गोविंदाची दाऊद आणि ठाकूरसोबत मैत्री होती. मतदारांमध्ये दहशत परववण्यासाठी गोविंदाने या दोघांची मदत घेतली होती.

1999 पासून 2004 पर्यंत केंद्रीय मंत्रिपदाची धुरा सांभाळलेले राम नाई म्हणाले की, "गोविंदाचे दाऊद आणि ठाकूर यांच्याशी संबंध होते हे सांगताना मी अजिबात चुकीचं वाटत नाही. त्यांनी त्यांच्या ताकदीचा वापर निवडणुकीत माझ्याविरोधात केला आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला."

मला जनतेने निवडलं : गोविंदा

दुसरीकडे, गोविंदाने नाईकांचे हे सर्व आरोप फेटाळले. गोविंदा म्हणाला की, "मला जनतेने विजयी केलं होतं. त्यावेळी मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नव्हती. अशाप्रकारचे आरोप करुन त्या मतदारासंघातील लोक अंडरवर्ल्डला सामील होते, असं राम नाईकांना म्हणायचं आहे. पण त्यांनी हे बोलून कोणाचाही अपमान करु नये."

"आता मी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत असताना, नाईक यांना आवाहन करतो की, त्यांनी माझं नाव खराब करु नये. तसंच माझ्या कामात अडथळा आणू नये," असंही गोविंदा म्हणाला.