मुंबई : बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटलेल्या ‘द जंगल बुक’च्या गाडीने आणखी वेग पकडला आहे. कारण पहिल्याच विकेंडमध्ये या सिनेमाने तब्बल 40.19 कोटींचा गल्ला जमवला आहे.

 

डिस्नेचा लाईव्ह-अॅक्शन अॅडव्हेंचर सिनेमा ‘द जंगल बुक’ची गाडी पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 9.76 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर शनिवारी 13.51 कोटी तर रविवारी तब्बल 16 .59 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे अवघ्या तीन दिवसात सिनेमाने 40.19 कोटी रुपये जमवले आहेत.

 

8 एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला सुट्टीमुळे पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. यानंतर तीन दिवसांच्या लाँग विकेंडचा फायदा चित्रपटाला मिळाला. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना लागलेल्या सुट्ट्यांचाही फायदा सिनेमाला झाला.

 

अक्षय कुमारच्या एअरलिफ्टनंतर जंगल बुक हा 2016 मधला सर्वात मोठं ओपनिंग मिळालेला दुसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. बॉलिवूड ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.


 

रिव्ह्यू : द जंगल बुक


सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सिनेमात एकच मानवी पात्र आहे, ते म्हणजे मोगलीचं. मोगलीची भूमिका साकारणारा लहानगा नील सेठीवर सर्व प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रियंका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर, ओम पुरी, शेफाली शाह, नील सेठी यांचे व्हॉईस ओव्हर व्यक्तिरेखांना लाभले आहेत.

 

बच्चे कंपनीसाठी बनवलेल्या ‘द जंगल बुक’ला ‘यूए’ प्रमाणपत्र


 

मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किप्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित ‘जंगल बुक’ हे कार्टून जगभरात गाजलं होतं. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मोगलीने टेलीव्हिजन स्क्रीनवरुन सिनेमागृहातल्या मोठ्या पडद्यावर झेप घेतली. मात्र जगभरातल्या बच्चे कंपनीला भुरळ पाडणाऱ्या ‘द जंगल बुक’ सिनेमाला ‘यूए’ प्रमाणपत्र देण्याचा संकुचितपणा भारतीय सेन्सॉर बोर्डाने दाखवला.

 

चित्रपटातील 3D इफेक्टमुळे मुलं घाबरण्याची शक्यता आहे, अशी न पटणारी सबब सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिली आहे. त्यामुळे पालकांची परवानगी नसेल तर चिमुकल्यांना ‘द जंगल बुक’ सारख्या अद्भुत कलाकृतीचा आनंद घेता येणार नाही.