38 Krishna Villa : कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विविध विषयांवरील नवीन नाटकं रंगभूमीवर दाखल झाली आहेत. काही येऊ घातली आहेत. नाटकाचा विषय कोणताही असो, विनोदी, गंभीर, रहस्यमय, आपल्या अनोख्या शैलीत ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा हातखंडा आहे अशा दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. ‘38 कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे मुख्य भूमिकेत आहेत. सध्या हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत असून स्वातंत्र्यदिनी '38 कृष्ण व्हिला'चा (38 Krishna Villa) अमृत महोत्सवी प्रयोग रंगणार आहे. 


डॉ. गिरीश ओक यांचे हे 50 वे नाटयपुष्प आहे. या त्रिवेणी संगमामुळे ‘38 कृष्ण व्हिला’ हे नाटक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरतं आहे. 'ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख'? नाटकाची ही टॅगलाइन त्यातील गर्भित अर्थ दाखवून देणारी आहे. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा... गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळीतुन चेहऱ्यामागचं खरं गुपित उलगडून दाखवलयं ‘38 कृष्ण व्हिला’ या नाटकातूनही चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


'38 कृष्ण व्हिला' नाटकाचे कथानक काय?


'38 कृष्ण व्हिला' या नाटकामध्ये डॉ. गिरीश ओक यांनी 'देवदत्त कामत'चे पात्र साकारलं आहे. देवदत्त कामत या प्रथितयश व्यक्तीवर नंदिनी चित्रे, ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते आणि त्यांच्यापुढे उभे राहते एक नवे आव्हान, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे! 38, कृष्ण व्हिला या घरात भरला जातो एक आगळा वेगळा खटला, सुरू होते आरोप प्रत्यारोपांची मालिका, वाद प्रतिवादांच्या फैरी झडतात आणि समोर येते एक धक्कादायक वास्तव! या पार्श्वभूमीवर बेतलेले हे नाटक अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांच मनोरंजन करणार असणार आहे.


'38 कृष्ण व्हिला' नाटकामध्ये डॉ. गिरीश ओक 'देवदत्त कामत' या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत या प्रथितयश व्यक्तीवर नंदिनी चित्रे, ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते आणि त्यांच्यापुढे उभे राहते एक नवे आव्हान, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे! अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं '38 कृष्ण व्हिला' हे नाटक आहे.


डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. गिरीश ओक, डॉ. श्वेता पेंडसे अभिनीत '38 कृष्ण व्हिला' या नाटकाचा अमृत महोत्सवी प्रयोग 15 ऑगस्टला सोमवारी दीनानाथ नाट्यगृहात दुपारी 4.15 वा. रंगणार आहे. या नाटकाची निर्मीती मिहीर गवळी यांनी केली असून सहनिर्माते उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. संगीत अजित परब तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांचे आहे.


संबंधित बातम्या


IFFM : 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्टपासून होणार सुरू; 'माली'चा होणार वर्ल्ड प्रीमियर


Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' 'या' दिवशीपासून होणार सुरू; दिव्यांका त्रिपाठीच्या नावाची चर्चा