भोपाळ : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित 'द  अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कोणत्याही चित्रपटगृहाने हा खोटा चित्रपट दाखवला तर होणाऱ्या नुकसानीला स्वत: चित्रपटगृहाचे मालक जबाबदार असतील, असा इशारा काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


मध्य प्रदेशामधील काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे ( एनएसयुआयचे ) अध्यक्ष विपीन वानखेडे यांनी 'द  अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या फेसबुक अकांउटवर पोस्ट करत, हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवू नये, असा इशारा दिली आहे.

दुसरीकडे मध्य प्रदेशचे भाजप प्रवक्ते उमेश शर्मा यांनी या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नुकतेच राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे नेते व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत, अराजकता पसरवत आहेत, असा आरोप उमेश शर्मा यांनी केला. तसेच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी द  अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट दाखवणाऱ्या सर्व चित्रपटगृहाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात कोणत्याही चित्रपटगृहाचं नुकसान झालं, तर भाजप रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असे संकेत देखील भाजप प्रवक्ते उमेश शर्मा यांनी दिले.

'द  अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दाखवून भाजप काँग्रेसच्या विरोधात अपप्रचार करत आहे, असा काँग्रेसने यापूर्वीच आरोप केला आहे.