Dharmaveer 2 : ठाण्यातील टेंभीनाका येथे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला यंदा अयोध्यातील राम मंदिरची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या हस्ते ठाण्यातील पहिली चांदीची विट अयोध्यातील राम मंदिरासाठी देण्यात आली होती. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. आता ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे दर्शन घेत प्रसाद ओकने 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
अष्टमीच्या आरतीत अचानक धर्मवीर आनंद दिघे येतात तेव्हा...
ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या अष्टमीच्या आरतीत अचानक धर्मवीर आनंद दिघे साहेब आरतीसाठी आले आणि ठाणेकरांच्या अंगावर काटा आला. टेंभी नाक्यावर 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या चित्रीकरणाला देवीच्या दारी अष्टमीला सुरूवात झाली. अष्टमीला धर्मवीर आनंद दिघे साहेब आरती घेत असे. यंदाच्या अष्टमीला प्रसाद ओकने तोच क्षण जिवंत केला.
प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशभूषात येऊन अष्टमीनिमित्त लहान मुलांसोबत आरती करत धर्मवीर दिघे यांची टेंभीनाक्याची नवरात्री उत्सवातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रसाद ओकला पाहण्यासाठी ठाण्यातील टेंभीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुर्गेश्वरीचे दर्शन घेतानाचे प्रसाद ओकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'धर्मवीर 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'धर्मवीर 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो. या सिनेमाबद्दल बोलताना मंगेश देसाई (Mangesh Desai) म्हणाले,"धर्मवीरांच्या खूप गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत, अनेक भाग करूनदेखील त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग 2024 ला घेऊन येत आहोत. 'धर्मवीर' एका भागात संपणारा विषय नसून, तो एक खंड आहे".
मंगेश देसाई पुढे म्हणाले,"धर्मवीर आनंद दिघे यांचे अनेक पैलू अद्याप गुलदस्त्यातच आहेत. त्यांच्या अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा आनंद दिघे नामक ज्वलंत व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारणारा अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे".
संबंधित बातम्या