मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. सिनेमातील संवाद दमदार असले तरीही बाळासाहेबांच्या आवाजाला जी धार होती, ती चित्रपटात ऐकायला मिळत नसल्याची नाराजी अनेक जण व्यक्त करत आहेत. कोणी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाचा पर्याय सुचवला, तर काहींनी डबिंग आर्टिस्टचा. पण एक अशी व्यक्ती आहे, जी बाळासाहेबांचा आवाज हुबेहूब काढते.


आवाजाचे जादूगार चेतन सशीतल यांना वर्षभरापूर्वी 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा आवाज इतका हुबेहूब काढला, की डोळे मिटून ऐकणाऱ्यांना आपण खुद्द बाळासाहेबांनाच ऐकत असल्याचा अनुभव घेता आला. इतकंच काय, तर सोशल मीडियावरही चेतन सशीतल यांच्याच नावाची चर्चा आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेबांचा काढलेला हुबेहूब आवाज तुम्ही ऐकू शकता (वेळ 28.50 मिनिटांपासून पुढे).

'ठाकरे' चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी चित्रपटात नवाजुद्दीनचाच आवाज ठेवण्यात आला असून मराठीसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला आहे. सचिन खेडेकरांचा आवाज लोकप्रिय असला तरी बाळासाहेबांच्या आवाजाशी साधर्म्य साधत नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यातूनच एक नाव समोर आलं, ते म्हणजे चेतन सशीतल यांचं.

'माझा कट्टया'वर बाळासाहेबांचा आवाज काढताना चेतन सशीतल यांनी एक किस्साही सांगितला होता. सशीतल जेव्हा बाळासाहेबांना भेटले होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना "माझा आवाज काढशील का?" असं विचारलं होतं. यावेळी त्यांनी बाळासाहेबांना त्यांचाच आवाज काढून चकित केलं होतं.



ठाकरे चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन बाळासाहेबांची तर अमृता रावने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका निभावली आहे. खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.