मुंबई : 'झिंगाट' चित्रपटातलं 'झिंग झिंग झिंगाट' गाणं लागलं की अजूनही कोणाचेही पाय थिरकायला लागतात. या सिनेमाचं नाव घेतलं की पटकन डोळ्यासमोर येते आर्चीची बुलेट, परशाची विहीरीतील उडी आणि अंगावर चर्रकन काटा आणणारा चित्रपटाचा शेवट. एक लहान मूल रडत घराबाहेर पडतं आणि प्रेक्षकांच्या काळजात धस्सं होतं. तेव्हाच आपल्या लक्षात आलं होतं, इथे 'सैराट 2' ची निर्मिती करायला वाव आहे. नव्या बातमीनुसार सैराट चित्रपटाच्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब झालं आहे.

'एबीपी माझा'ने काही महिन्यांपूर्वी थेट दिग्दर्शक नागराज मंजुळेंना याबाबत विचारलं होतं. तर तेव्हा सैराटचा पार्ट टू करायला त्यांनी नाही म्हटलं नव्हतं! मात्र नव्या माहितीनुसार 'सैराट'च्या सिक्वेलची तयारी पुण्यात सुरु झाली आहे.

चित्रपट महामंडळाच्या पुण्याच्या शाखेत सिनेमाच्या शीर्षकाची नोंदणी करण्यात आली आहे. त्यात निर्मिती संस्था म्हणून आटपाटचं नाव आहे. आतली बातमी ही, की याबद्दल एक मीटिंग नुकतीच कोथरुडमधील नागराज मंजुळेंच्या घरी झाली.

सैराटमधलं ते छोटं बाळ आता मोठं होणार आहे. सैराटमध्ये हैद्राबादमधली मावशी जी आर्ची परशाला आसरा देते, ती सुमन आक्का या मुलाला मोठं करते. त्यावेळी छाया कदम यांनी साकारलेल्या रोलसाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विचार सुरु आहे.



बाकी सिनेमात परशाचे मित्र असणार आहेत. याचं दिग्दर्शन नागराज मंजुळेच करणार असल्याची बातमी आहे. आता यात बदल होतीलच. कारण सिनेमाचं शूट सुरु व्हायला अजून वेळ आहे. आत्ता नागराज अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'झुंड'चं शूट नागपुरात करत आहेत. साहजिकच हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर ते नवीन सिनेमाची जुळवाजुळव सुरु करणार. तोपर्यंत या सिनेमात काय पहायला मिळणार, याची उत्सुकता लागून राहणारच.