Chandra Mohan: तेलुगू चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात, चंद्र मोहन यांच्यावर सुरू होते. सकाळी 9.45 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. चंद्र मोहन यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुले असा परिवार आहे. सोमवारी (13 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये चंद्र मोहन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अभिनेते चिरंजीवी यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन चंद्र मोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.चिरंजीवी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,"सिरीसिरिमुव्वा, संकरभरणम , 'राधाकल्याणम' आणि 'नाकू' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अष्टपैलू अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि नायक चंद्र मोहन गरू यांचे निधन झाले, हे जाणून अतिशय दुःख झाले. 'प्रणाम खरिदू' या माझ्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. त्या प्रसंगी आमची ओळख झाली नंतर आमच्यात मैत्री झाली.त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना"
अभिनेता साई धरम तेजनं देखील ट्वीट करुन चंद्र मोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, "त्यांचा संस्मरणीय अभिनय आणि पात्रांमुळे प्रत्येक वेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य येते. चंद्र मोहन सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती"
चंद्र मोहन यांनी 1966 मध्ये 'रंगुला रत्नम' या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी सुमारे 900 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मल्लमपल्ली चंद्रशेखर राव हे चंद्र मोहन यांचे खरे नाव होते.