Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. टोल वाढीवरुन (Toll Agigation) मनसे (MNS) आक्रमक झाले असून अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही आवाज उठवला आहे. तेजस्विनीच्या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. आता या ट्वीटनंतर तिचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आलं आहे.


राजकीय दबाव टाकून तेजस्विनी पंडितच्या ट्विटर (एक्स) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काढण्यात आलं आहे. आता यासंदर्भात ट्वीट करत अभिनेत्रीने तिचं मत मांडलं आहे. तेजस्विनीने ट्वीट करत लिहिलं आहे,"कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?".






तेजस्विनीने पुढे लिहिलं आहे,"X (ट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा 'जय हिंद जय महाराष्ट्र'साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र!". तेजस्विनीच्या या ट्वीटला मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. तेजस्विनीनं टोल या विषयावर दाखविलेला ठामपणाचे मनसेनं कौतुक केलं आहे. 






तेजस्विनीचं ट्वीट काय होतं? (Tejaswini Pandit Tweet)


तेजस्विनी पंडितने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा टोलबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते म्हणत होते,"शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही छोट्या गाड्यांना टोल मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रात आपण केवळ कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो".






तेजस्विनीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं,"म्हणजे? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? 
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून". 


संबंधित बातम्या


Tejaswini Pandit: "आम्ही जो टोल भरत आहोत तो कुणाच्या खिशात जातोय?"; तेजस्विनी पंडितचा सवाल, देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "राजसाहेब ..."