Tee Mee Navhech : 'ती मी नव्हेच' (Tee Mee Navhech) या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 'ती मी नव्हेच' या सिनेमानं आता सिनेसरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
परितोष पेंटर यांनी लिहिलेल्या 'ती मी नव्हेच' या सिनेमात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत हे बॉलिवूड कलाकार प्रथमच मराठीमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. आठवणींना उजाळा देत श्रेयस म्हणाला,"एकेकाळी 'रंगीला'मधील 'या ही रे' या गाण्यातील उर्मिलाच्या रुपानं सर्वांना घायाळ केलं होतं. त्याच उर्मिलासोबत कधी काळी स्क्रीन शेअर करायला मिळेल असं वाटलं नव्हतं. परितोषनं ही किमया साधली आहे. योगायोग म्हणजे आम्ही दोघेही मिठीबाई कॉलेजचे विद्यार्थी आहोत. उर्मिलासोबत काम करण्याची संधी मिळाल्यान खूप आनंदी आहे". 'ती मी नव्हेच' हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा असल्याचंही श्रेयस म्हणाला.
'ती मी नव्हेच' असं म्हणत एका मोठ्या कालावधीनंतर उर्मिला मराठीमध्ये पुनरागमन करत आहे. अस्खलित मराठीत उत्स्फूर्तपणे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना उर्मिला म्हणाली की, सिनेमाची कथा ऐकताक्षणी मला भावली. त्यामुळे पारितोषला नकार देऊच शकले नाही. 'ती मी नव्हेच'च्या माध्यमातून पारितोषसोबत काम करण्याचा आनंद तर आहेच शिवाय मराठी चित्रपटाद्वारे आणि श्रेयस तळपदेसारख्या सहकलाकारासोबत काम करायला मिळत असल्याचा विशेष आनंद झाल्याचं उर्मिला म्हणाली.
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'हे' मराठी सिनेमे
'ती मी नव्हेच' या सिनेमासह 'निरवधी', 'सुटका', 'एप्रिल फुल', 'फक्त महिलांसाठी', 'थ्री चिअर्स' आणि 'एकदा येऊन तर बघा' हे सिनेमेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अवघ्या मनोरंजन विश्वाला आश्चर्याचा सुखद धक्का देत मराठी सिनेसृष्टीनं एकाच वेळी तब्बल सात सिनेमांची घोषणा करत सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षक आता या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या