'सैराट'मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणारं आहे,या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू दे आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिकाधिक यश मिळू दे, अशी प्रार्थना उद्धव यांनी केली. दुपारी एकच्या सुमारास सैराटची टीम मातोश्रीवर हजर होती.
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवणाऱ्या 'सैराट' चित्रपटाची टीम आज मातोश्रीवर जाणार आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. नागराज मंजुळेंसह आर्ची-परशा साकारणारे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर तमाम रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या कौतुकाची थापही त्यांच्या पाठीवर पडणार आहे.
अनेक चित्रपट महोत्सवात आपली छाप पाडणाऱ्या सैराटची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जात आहे. सैराटने नटसम्राट चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं होतं. ‘सैराट’ मराठीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रेमकथेनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं असल्याचंही फोर्ब्सनं म्हटलं आहे.