मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक असलेला पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करण्याला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलरही यूट्यूबवरून हटवण्यात आला आहे.

मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर पाहण्यासाठी 'पीएम नरेंद्र मोदी ऑफिशियल ट्रेलर' असे युट्यूबवर सर्च केल्यानंतर चित्रपटाचा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचा मजकूर पाहायला मिळतो. निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिलेल्या स्थगितीच्या निर्णयामुळे हा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट सुरुवातीला 29 मार्च रोजी प्रदर्शित केला जाणार होता. परंतु सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हा चित्रपट मतदानाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 11 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित केला जाऊ नये यासाठी विरोधी पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे म्हणत जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपवली. त्यानंतर निवडणूक काळात चित्रपट प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल, असे मत मांडत निवडणूक आयोगानं 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, असा निर्णय घेतला.