Tanushree Dutta on Nana Patekar :  अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने #MeToo वेळी अभिनेते नाना पाटेकर यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर या माध्यमातून अनेक कलाकारांवर काही अभिनेत्रींनी सारखेच आरोप केले. याची सुरुवात तनुश्री दत्ताने केली होती. त्यानंतर नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी या प्रकरणावर मौन बाळगणंच पसंत केलं होतं. त्यानंतर आता सहा वर्षांनी या आरोपांवर भाष्य करत हे आरोप खोटारडे असल्याचं म्हटलं. पण त्यावर तनुश्री दत्त हिने नाना पाटेकरच खोटारडे असल्याचं म्हटलं आहे. तसेच तिने हा मला संपवण्याचा डाव असल्याचं म्हणत पुन्हा एकदा नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केलेत. 


नाना पाटेकरांनी द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सगळ्यावर भाष्य केलं. तसेच आता नानांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर तनुश्री दत्ताने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने नाना पाटेकर हेच खोटारडे असल्याचं म्हटलं आहे. 


तनुश्री दत्ता काय म्हणली?


तनुश्रीने या मुलाखतीमध्ये म्हटलं की, नाना पाटेकर हे पॅथॉलॉजिकल खोटारडे आहेत आणि हे सगळ्या जगाला माहितेय की ते किती मोठे खोटारडे आहेत ते. नाना पाटेकर यांनी अनिल शर्माच्या सिनेमाच्या शुटींगवेळी एका मुलाच्या कानशि‍लात लगावली. त्यांनी आधी त्या मुलाला मारलं त्यानंतर हा शूटचा एक भाग असल्याचं भासवण्याचा त्यांनी प्रय्तन केला. त्यानंतर लोकांनी टीका केल्यावर माघार घेत मनापासून माफी मागितली. मी आयुष्यात एका फ्लॉप कॅरेक्टर कलाकारासोबत गाणं करण्यास परवानगी दिली ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. या गोष्टीची कोणीही पर्वा केली नाही. मी प्रोफेशनलिझम म्हणून त्या गाण्याचं शुटींगही पूर्ण केलं. त्यामुळे आता पूर्ण मुंबईला माहितेय की, नाना पाटेकर सारख्या बनावट माणसाने माझी फवणूक कशी केली आणि मानसिकदृष्ट्या मला कसा त्रास दिला ते. त्यामुळे अशी विधानं करुन ते स्वत:च्या गोष्टी झाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मला संपवण्याचा डावही रचला जातोय. 


नाना पाटेकरांनी काय म्हटलं होतं?


नाना पाटेकरांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, मला माहित होतं की, हे सगळे आरोप खोटे आहेत. म्हणून मला राग नाही आला. जेव्हा सगळं खोटं होतं तेव्हा मला त्या गोष्टीचा राग का यावा? आणि आता या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. जे घडून गेलंय, त्याविषयी आपण आता काय बोलणार? सगळ्यांना खरं काय आहे, ते माहित आहे. मुळात मी त्या वेळी काय बोलू शकणार होतो, जेव्हा असं काही घडलंच नव्हतं. अचानक कोणीतरी येऊन म्हणतं की तुम्ही असं केलं आहे, तुम्ही तसं केलं आहे. मी या सगळ्याचं काय उत्तर देणं अपेक्षित होतं? मी काहीच केलं नाहीये, हे मला माहित असताना मी काहीच केलं नाही, असं बोलणं अपेक्षित होतं का? 


तनुश्री दत्ताचे आरोप काय?


तनुश्री दत्ताने अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) 2018 मध्ये MeToo दरम्यान नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तनुश्रीने 2008मध्ये आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.तनुश्रीने 2018 मध्ये भारतात MeToo चळवळ सुरू केली, जेव्हा तिने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्यावेळी तनुश्रीने म्हटलं होतं की, हॉर्न ओके प्लीज चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. हे गाणे एकाच अभिनेत्यावर शूट करायचे होते, पण तरीही त्या दिवशी नाना पाटेकर सेटवर उपस्थित होते.  


ही बातमी वाचा : 


Nana Patekar  : तनुश्री दत्ताच्या आरोपांवर अखेर 6 वर्षांनी नानांनी सोडलं मौन, म्हणाले, 'अचानक येऊन कुणीतरी म्हणतं...'