मुंबई : तनुश्री दत्ताने सौंदर्यस्पर्धा जिंकली आणि तिच्याकडे सर्वाचं लक्ष गेलं. रंगाने सावळी असूनही तिने आपल्या फीचर्समुळे सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. तनुश्री दत्ताने फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेत अंतिम दहा स्पर्धकांमध्ये तिने बाजी मारली होती. त्यानंतर जे व्हायचं तेच झालं. पुढे तनुश्री बॉलिवूडमध्ये आली. 'आशिक बनाया आपने' हा तिचा गाजलेला चित्रपट. त्यातही तिने दिलेला बोल्ड लूक सगळ्यांना भावला. इम्रान हाश्मी आणि तनुश्रीची केमिस्ट्री अनेकांना आवडली.
तनुश्रीने बॉलिवूडमध्ये आल्यानंतर काही चित्रपट केले. त्यात चॉकलेट, ढोल, भागमभाग आदी चित्रपटांचा समावेश होतो. पण ती गाजली ती #MeToo या मुव्हमेंटमुळे. तनुश्रीने 2008 मध्ये नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप केला. त्यावेळी तो फार चर्चेत आला नाही. पण नंतर तिने ही इंडस्ट्री सोडली आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. #MeTooचा मुद्दा दोन वर्षांपूर्वी चर्चेत आला तेव्हा पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने आरोप केले. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. हे प्रकरण चालू असतानाच आता तनुश्रीने आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय आहे भारतात परत येण्याचा. होय, तनुश्री दत्ता आता भारतात परत येत आहे. अमेरिकेतली चांगली नोकरी सोडून शिवाय अमेरिकेतल्या संरक्षण मंत्रालयातील एक ऑफर धुडकावून तनुश्री आता भारतात येणार आहे. विशेष म्हणजे तिने आता आपलं वजन 15 किलोंनी कमी केलं आहे. भारतात येऊन पुन्हा एकदा सिनेसृष्टीत स्वत:ला आजमावणार आहे. तिच्या पदरात काही ऑफर्सही आहेत.
तनुश्री परत येते आहे हे खरं असलं तरी आता तिच्या येण्याने नाना पाटेकर यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ होईल की हा वाद मिटून पुन्हा एकदा ती सिनेसृष्टीत सक्रिय होईल हे पाहायला हवं. तनुश्रीने केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हेही पाहायला हवं. तिला सिनेमात घेताना आता निर्माते दिग्दर्शक हा सर्व विचार करतील. कारण तनुश्रीने केलेल्या 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर तिच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप केला होता. हा आरोप नाना पाटेकर, गणेश आचार्य यांच्यावर झाला होता.