प्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2018 09:03 AM (IST)
विक्रम यांचा मुलगा ध्रुव चालवत असलेली गाडी रिक्षावर धडकून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. विक्रम यांचा मुलगा ध्रुव चालवत असलेली गाडी रिक्षावर धडकून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. निष्काळजीपणे गाडी चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी ध्रुव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वैयक्तिक जातमुचलक्यावर ध्रुवची नंतर सुटका करण्यात आली. चेन्नईतील टीटीके मार्गावर रविवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षाचालक कमेशवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. अपघातात रिक्षाचाही चक्काचूर झाला. अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत, मात्र ध्रुवने मद्यपान केलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघातावेळी त्याच्यासोबत गाडीत आणखी दोघे जण होते. अभिनेते विक्रम यांची भूमिका असलेले अपरिचित, आय, रावण यासारखे चित्रपट बॉलिवूडमध्ये गाजले आहेत.