Tamanna Bhatia Aranmanai 4 : अभिनेत्री तमन्ना भाटियाची (Tamanna Bhatia) प्रमुख भूमिका असलेल्या तामिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा चित्रपट आता हिंदीतमध्येही प्रदर्शित होणार आहे.  'अरनमानाई 4 या तमिळ चित्रपटाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. आता  चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. येत्या 24 मे रोजी 'अरनमानाई 4' हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले. आता हा चित्रपट हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. त्याशिवाय रजनीकांत यांची भूमिका असणारा 'लाल सलाम' हा चित्रपटही हिंदीत झळकणार आहे.

  


'अरनमानाई 4'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा 'अरनमानाई 4' पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.


आजची सर्वात मोठी पॅन इंडिया स्टार असलेली तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. ई. कृष्णसामी यांची सिनेमॅटोग्राफी आणि हिप-हॉप तमिझाद्वारे तयार केलेल्या हळूवार साउंडट्रॅकमुळे चित्रपटातील रहस्यमय वातावरण अधिकच गडद बनते. या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे. रहस्य, हास्य आणि उत्साहाचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या ब्लॅाकबस्टर चित्रपटाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांना लुटता यावा यासाठी कार्मिक फिल्म्सने 'अरनमानाई 4' हिंदीत डब करण्यात आला आहे. अनोख्या आणि शक्तिशाली कथा सिल्व्हर स्क्रीनवर आणण्यासाठी कार्मिक फिल्म्स ही निर्मितीसंस्था ओळखली जाते. 


सुपरस्टार रजनीकांतचा 'लाल सलाम' हिंदीत होणार प्रदर्शित...


सुपरस्टार रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे. लाल सलाम चित्रपटात भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवचीही भूमिका आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत लाल सलाम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली होती. त्यानंतर आता दक्षिणेप्रमाणेच हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या मनातही हा चित्रपट आपलं अनोखं स्थान निर्माण करत यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.