मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करने राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक हिमांशू शर्मा यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं कधीच लपवलं नव्हतं. मात्र दोघांच्या नात्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे. स्वरा भास्कर आणि हिमांशू यांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे.
स्वरा आणि हिमांशू यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आनंद एल राय यांच्या 'तनू वेड्स मनू' चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. 2015 मध्ये सिनेमाच्या सिक्वेलच्या शूटिंगवेळी दोघांनी डेटिंग करायला सुरुवात केली. रांझना, नील बांटे सन्नाटा यासारख्या चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं 'मुंबई मिरर'ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
स्वरा आणि हिमांशू यांनी परस्पर संमतीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचं दोघांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं. दोघंही एकमेकांशी बोलतात, आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या निर्णयाची कल्पना आहे.
खरं तर, गेल्याच वर्षी 'वीरे दी वेडिंग' चित्रपट हिट झाल्यानंतर दोघं युरोपमध्ये सुट्टीसाठी गेले होते. या फोटोवर 'जेव्हा तुमची गर्लफ्रेण्ड तुम्हाला जबरदस्ती वेकेशनवर नेते आणि सेल्फी काढायला लावते' असं कॅप्शन तिने दिलं होतं. मात्र आता दोघांचं फिस्कटल्याचं समोर आलं आहे.
स्वराने 2010 साली संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गुजारिश' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने तनू वेड्स मनूचे दोन्ही भाग, रांझना, औरंगजेब, वीरे दि वेडिंग यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.