मुंबई : 'पद्मावत' चित्रपटाला करणी सेनेने केलेल्या विरोधानंतर अख्खं बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या पाठीशी उभं राहिलं. मात्र भन्साळींसोबत काम केलेली अभिनेत्री स्वरा भास्करनेच त्यांना नाराजीचं पत्र लिहिलं. विशेष म्हणजे आपण हे सगळं कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करण्यासाठी केल्याचं सांगत, आता स्वराने दात काढले आहेत.

पद्मावत चित्रपट पाहून आपण केवळ एक योनी असल्याची भावना मनात निर्माण झाली, असं पत्र स्वरा भास्करने संजय लीला भन्साळी यांना उद्देशून लिहिलं. 'मला प्रकाशझोतात राहायला आवडतं. मी निव्वळ वादंग निर्माण करण्यासाठी तसं पत्र लिहिलं' असा दावा स्वराने ट्विटरवर केला आहे.


स्वराचं खुलं पत्र

स्वरा भास्करने संजय लीला भन्साळी यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात जोहारचं उदात्तीकरण केल्याचा दावा केला आहे. बलात्कार झाला तरी महिलांना जगण्याचा अधिकार आहे सर. पतीच्या निधनानंतरही महिलांना जगण्याचा अधिकार आहे. पुरुष संरक्षक, मालक.. तुम्ही वापराल तो शब्द. पुरुष जिवंत असो वा नसो, त्यांच्याशिवायही महिलांना जगण्याचा अधिकार आहे. स्त्रिया म्हणजे चालती-बोलती योनी नाहीत.



शाहीद काय म्हणाला?

'स्वराने भन्साळींना पत्र लिहिल्याचं समजलं, पण मी ते अजून वाचलं नाही. पत्र खूप लांबलचक आहे आणि आम्ही सगळेच व्यस्त आहोत. मला माहित नाही, तिचा मुद्दा काय, पण भन्साळी सरांसोबत तिचा काहीतरी वाद असावा. पण मला वाटतं ही यासाठी योग्य वेळ नाही. पद्मावत अख्ख्या चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधीत्व करतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याचा हा मुद्दा आहे. लोकांपर्यंत पोहचण्याचा चित्रपटाचा प्रवास खूप कठीण होता. संपूर्ण सिनेसृष्टी आमच्या पाठीशी ठाम उभी आहे. सध्या तरी तिचं पत्र मला नगण्य वाटतं. तिने तिचा वैयक्तिक मुद्दा मांडला आहे आणि अर्थात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.' असं शाहीद म्हणतो.

सुचित्रा कृष्णमूर्तीच्या कानपिचक्या

दिवाना फेम अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीनेही स्वरा भास्करचे कान उपटले. 'पद्मावत बाबत असलेले फेमिनिस्ट वाद मूर्खपणाचे आहेत. महिलांनो, ही केवळ कथा आहे. जोहारची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. तुमचा मुद्दा मांडण्यासाठी वेगळे वाद उकरुन काढा. खराखुरा वाद, काल्पनिक ऐतिहासिक नको.' असं सुचित्रा ट्विटरवर म्हणाली.








संजय लीला भन्साळींच्या 'गुजारिश' चित्रपटात स्वराने अभिनय केला होता. याशिवाय अनारकली ऑफ आरा, तनू वेड्स मनू, औरंगझेब, रांझना, प्रेम रतन धन पायो यासारख्या चित्रपटातही ती झळकली आहे.

तेराव्या शतकातील कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या 'पद्मावत' काव्यावर आधारित 'पद्मावत' हा चित्रपट आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूरने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.