Prakash Raj: चांद्रयान-3 (Chandrayaan 3) ने 23 ऑगस्ट 2023 रोजी  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार मानले. भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी (Swami Chakrapani) यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी केली. स्वामी चक्रपाणी यांच्या या मागणीवर एक ट्वीट शेअर करुन अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


प्रकाश राज यांचे ट्वीट



प्रकाश राज यांनी एका न्यूज आर्टिकलची लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये  चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे, असं लिहिलेलं दिसत आहे. ही लिंक शेअर करुन प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं,  'ओके तुमचा प्रवास सुखकर होवो! चांद्रयानच्या लँडिंगनंतर चंद्राला "हिंदु राष्ट्र" घोषित करावे अशी स्वामींची इच्छा आहे.' प्रकाश राज यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 






प्रकाश राज हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी चांद्रयान-3 मिशनबाबत ट्वीट केल्याबद्दल अभिनेता प्रकाश राज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.


प्रकाश राज हे विविध विषयांवर आधारित असणारे ट्वीट शेअर करत असतात. त्यांच्या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी  द केरळ स्टोरी, द कश्मीर फाइल्स या चित्रपटांबाबत देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.


प्रकाश राज यांचे चित्रपट


प्रकाश राज यांनी अनेक हिंदी तसेच साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी वारिसू, केजीएफ, वॉन्टेड या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिंघम या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी  जयकांत शिक्रे ही भूमिका साकारली होती. बॉलिवूड बरोबरच साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.   प्रकाश यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


महत्त्वाच्या बातम्या:


Swami Chakrapani : चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, तर शिवशक्ती पॉईंटला राजधानी करा; स्वामी चक्रपाणी यांची मागणी