Aamir Khan Next Movie Ujjwal Nikam Biopic : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आहे. आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यानंतर अभिनेत्याने काही दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पण आता सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान (Aamir Khan Next Movie) मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आमिरने अभिनयक्षेत्रापासून ब्रेक घेतला असला तरी त्याच्या निर्मितीसंस्थेवर मात्र त्याचं लक्ष होतं. पण आता या ब्रेकनंतर दमदार कमबॅक करण्यासाठी आमिर सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'स्त्री' या सिनेमाचे निर्माते दिनेश विजन (Dinesh Vijan) यांच्या आगामी सिनेमात मिस्टर परफेक्शनिस्ट झळकणार आहे.
आमिर खानला नेहमीच प्रयोग करायला आवडतात. त्याचे वेगवेगळ्या धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात 'मंगल पांडे : द राइजिंग'पासून ते 'दंगल'पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. आता त्याच्या या सिनेमांच्या यादीत लवकरच एका सिनेमाचा समावेश होणार आहे. आमिर खान ज्येष्ठ सरकारी वकील उज्जवल निकम यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
उज्जवल निकम यांच्या जीवनपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण काही ना काही कारणाने या सिनेमावर काम करता आलं नाही. उमेश शुक्ला यांनीदेखील उज्जवल निकम यांचा बायोपिकवर काम करत असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. पण यासंदर्भात अद्याप त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत!
सिनेमाई गलियारोंच्या रिपोर्टनुसार, उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकसाठी आमिर खानला कोरोनाकाळाआधी विचारणा झाली होती. अनेक निर्मात्यांनी उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकसाठी प्रयत्न केले. पण आता दिनेश विजन यांनी या सिनेमाची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे. एकीकडे आमिरने मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तो हा सिनेमा करणार का? उज्ज्वल निकम यांचा बायोपिक आमिरचा कमबॅक सिनेमा असेल का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
उज्जवल निकम यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Ujjwal Nikam)
उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या