नीता लुल्लांच्या फॅशन शोमध्ये रॉमन सुष्मिताला चीअर करताना पाहून दोघांतील प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं. 42 वर्षांची सुष्मिता सेन सिंगल मदर असून तिने रीनी आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. रॉमनची या दोघींशी फार छान गट्टी जुळल्याचंही म्हटलं जातं.
सुष-रॉमनने नुकतंच डेटिंग सुरु केल्यामुळे इतक्यात आपल्या नात्याविषयी अधिकृतपणे वाच्यता केलेली नाही. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी एका फॅशन शोमध्ये दोघांची भेट झाली. अद्याप दोघांनीही एकत्र फोटो शेअर केलेला नाही.
गेल्या वर्षी सुष्मिता हॉटेलियर रितीक भसिनला डेट करत होती, मात्र ते नातं फार काळ टिकू शकलं नाही. यापूर्वी तिचं नाव दिग्दर्शक विक्रम भट, हॉटेलियर संजय नारंग, अभिनेता रणदीप हुडा यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं.
वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी म्हणजे 1994 मध्ये सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. मिस युनिव्हर्स जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.
दस्तक चित्रपटातून 1996 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुष्मिताचे बिवी नं. 1, आँखे, मै हू ना, फिलहाल, समय यासारखे अनेक चित्रपट गाजले. गेल्या दहा वर्षांत मात्र तिचे फारसे चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत.
सुष्मिताने तरुण वयातच रीनीला दत्तक घेतलं, ती आता 18 वर्षांची आहे. तर तिची दुसरी दत्तक कन्या अलिशा आता 9 वर्षांची आहे.