मुंबई : मी टू चळवळीचं वारं वाहायला लागल्यानंतर देशभरातील अनेक दबलेल्या आवाजांना वाचा फुटली. आतापर्यंत अनेक महिलांनी आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचे अनुभव सांगितले. अनेक पुरुष कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र सध्याच्या 'मी टू मूव्हमेंट'मध्ये कदाचित पहिल्यांदाच एका अभिनेत्याने आपल्यासोबत झालेल्या लैंगिक गैरवर्तनाबाबत जाहीर वाच्यता केली आहे. रेस 3, ढिश्यूम सारख्या चित्रपटातील अभिनेता साकिब सालेमने 9 वर्ष जुनी असलेली नकोशी आठवण सांगितली.


साकिब सालेम हा प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीचा भाऊ. 2011 मध्ये त्याने 'मुझसे फ्रँडशिप करोगे?' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मेरे डॅड की मारुती, बॉम्बे वेल्वेट, हवाहवाई, ढिश्यूम, रेस 3 सारख्या सिनेमात त्याने अभिनय केला. 2009 साली, म्हणजे 21 वर्षांचा असताना आलेला दु्र्दैवी अनुभव साकिबने 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

'मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. मी अभिनेता म्हणून सुरुवात केली, तेव्हा अवघा 21 वर्षांचा होतो. त्या व्यक्तीने माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्या पँटमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला. माझा विरोध त्याच्या सेक्शुअॅलिटीला नाही, तर त्याच्या कृत्याला होता' असंही साकिब म्हणाला.

'त्या व्यक्तीचे चित्रपटसृष्टीत अनेक समलिंगी मित्र आहेत. जेव्हा ही घटना माझ्यासोबत घडली, तेव्हा मी त्याला फैलावर घेतलं. मी निघून गेलो. मी केवळ 21 वर्षांचा होतो. मी घाबरलोही होतो. पण मी ती घटना विसरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जण वेगळा असतो, त्यामुळे अशा घटनांचा प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो' असंही साकिबने म्हटलं.

#MeToo चं वादळ

अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला. कंगना रनौत, सोना मोहापात्रा, हिमानी शिवपुरी, सिमरन कौर सुरी, संध्या मृदुल, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर, शोमॅन सुभाष घई, अभिनेता विकी कौशलचे वडील म्हणजेच अॅक्शन दिग्दर्शक श्याम कौशल, दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. अगदी कॉमेडियन अदिती मित्तलवरही महिला कॉमेडियनने गैरवर्तनाचे आरोप केले. शक्ती कपूर, राहुल रॉय , सैफ अली खान यांनीही मीटू चळवळीवर मत व्यक्त केलं.

#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. तर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला.