मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनने दत्तक घेतलेल्या मुलीला तिसऱ्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिलं. बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी सनी पती डॅनिअल वेबर आणि लेक निशासोबत मेक्सिकोला गेली.

मेक्सिकोतील कॅन्कुन शहरातल्या बीचवर काढलेले फोटो सनी आणि डॅनिअल यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोत निशाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं दिसतं.

'या हास्यातून सारं काही उमगतं. हॅपी बर्थडे बेबी गर्ल. मला तुझा खूप अभिमान आहे' असं सनीने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.


'माझ्या लाडक्या निशा कौरला तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तुझ्यासोबत प्रत्येक दिवस म्हणजे जणू वरदानच. तू आमच्या आयुष्यात आलीस, त्यासाठी देवाचे मी दररोज आभार मानतो. आमच्या आनंदाची व्याख्या तू आहेस' असं डॅनिअल वेबरने लिहिलं आहे.


लातूरमधील एका अनाथाश्रमातून गेल्या वर्षी सनी आणि डॅनिअलनी निशाला दत्तक घेतलं होतं. तर यावर्षी त्यांनी सरोगसीद्वारे अशर आणि नोआ या जुळ्या बाळांचं पालकत्व स्वीकारलं.