मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत पुन्हा एकदा बायोपिक करण्याची शक्यता आहे आहे. मोजक्या चित्रपटातून चाहत्यांच्या मनावर छाप पाडणारा सुशांत सिंग लवकरच एका भव्य प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. लेजेंडरी कुस्तीपटू 'द खली'च्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुशांत मुख्य भूमिका साकारण्याची चिन्हं आहेत.


रेसलर दलिप सिंग राणा म्हणजेच खलीच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट तयार केला जाणार आहे. खलीशी याबाबत चर्चा झाली असून त्याने निर्मात्यांना चित्रपट निर्मितीचे हक्क दिले आहेत. या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.

खलीच्या फक्त रेसलिंग स्कील बाबतच सर्वांना माहिती आहे. मात्र यापूर्वी तो पंजाब पोलिसात अधिकारी म्हणून कार्यरत होता. कुस्तीच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यापूर्वी त्याने खूप मोठा संघर्ष केला आहे. त्याचा प्रवास चित्रपटात मांडला जाणार आहे.

खलीची उंची सात फूट एक इंच असून त्याचं वजन 157 किलो आहे. वजन-उंचीसारख्या शारीरिक बाबींमध्ये साम्य नसल्यामुळे खलीची भूमिका साकारताना सुशांतपुढे मोठं आव्हान असेल. मात्र ज्याप्रकारे सुशांतने माहीच्या लकबी उचलून

त्याचं व्यक्तिमत्त्व हुबेहूब साकारलं, त्यावरुन खलीच्या भूमिकेत तो जीव ओतेल, याविषयी चाहत्यांना शंका नाही. बॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्याची फिजीक खलीशी मिळतीजुळती नाही. त्यामुळे कदाचित निर्मात्यांना व्हीएफएक्सचा वापर करावा लागू शकतो.

यापूर्वी 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटात सुशांतने कॅप्टन कूल धोनीची भूमिका केली होती. आगामी 'चंदामामा दूर के'मध्ये तो अॅस्ट्रॉनॉटची व्यक्तिरेखा साकारत आहे.