मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला तीन महिन्यापेक्षाही जास्तचा कालावधी उलटला आहे. सुशांतने 14 जूनला त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही आहे. सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टचा तपास करत असलेल्या एम्सच्या तपासकर्त्यांना सुशांतच्या शरीरात काही केमिकल ट्रेसेस सापडले आहेत. सुशांतच्या मृत्यू मागे या केमिकल ट्रेसेसचा काही संबंध आहे का? आता याचा तपास एम्सची टीम आणि सीबीआयकडून केला जाणार आहे.


एम्सच्या रेकॉर्डनुसार सुशांत सिंह राजपूतच्या विसरा तपासासाठी सुशांतच्या शरिराच्या काही भागांना सीज करण्यात आलं होतं. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होता.




  • पोटाचा भाग (part of stomach)

  • छोट्या आतड्याचा भाग (Part of small intestine with food material presented)

  • यकृताचा भाग (1/3 part of liver)

  • पित्ताशयाचा भाग (part of gallbladder)

  • दोन्ही बाजूचे मूत्रपिंड (1/2 kidney of both side)

  • 10 ML रक्त (10 ML blood)

  • टाळूचे केस (scalp hair)


या भागांचा समावेश होता, एम्सच्या टीमने या सर्वांचा तपास करत सखोल अभ्यास केला, त्यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या शरीरामध्ये काही केमिकल ट्रेसेस सापडले. मात्र, या केमिकल ट्रेसेसमुळेच सुशांतचा मृत्यू का झाला याचं उत्तर अजून शोधायचं आहे.


या केमिकल ट्रेसेसमुळे निर्माण झालेले काही महत्वाचे प्रश्न




  • हे केमिकल ट्रेसेस सुशांतच्या शरिरात आले कसे?

  • हे केमिकल जर खाण्या पिण्याच्या पदार्थामधून देण्यात आले असतील तर ते सुशांतला कोणाकडून देण्यात आले?

  • या केमिकल पदार्थांचा सुशांतच्या शरिरावर काय परिणाम झाला?


एम्सच्या टीमच्या या नवीन शोधामुळे आता पुन्हा सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला नवीन वळण येण्याची शक्यता आहे. सुशांत सोबत काही घातपात तर झाला नाही ना हा प्रश्न सुद्धा आता पुन्हा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. सुशांतचे कुटुंबीय आधीपासूनच सुशांतच्या मृत्यूवर शंका निर्माण करत होते. एम्सच्या या रिपोर्टमुळे सुशांतच्या कुटुंबीयांच्या शंकेला बळ मिळण्याची शक्यता आहे.


अजूनपर्यंत एम्सचा तपास संपलेला नाही. म्हणून या आठवड्यात होणारी मेडिकल बोर्डाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. कारण मेडिकल बोर्डाच्या या बैठकीमध्ये हा रिपोर्ट सादर करणयात येणार होता. मात्र, एम्सच्या तपास कर्त्यांचा तपास सुरू असल्यामुळे अंतिम निकषावर अद्यापही ते पोहोचू शकले नाही आहेत. ज्यामुळे हा रिपोर्ट सादर होऊ शकणार नसून मेडिकल बोर्डाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.


आपला रिपोर्ट पूर्ण करून हा रिपोर्ट सीबीआयला देण्यात येणार आहे, ज्याच्यानंतर आतापर्यंतच्या झालेल्या आणि पुढील तपासानंतर सीबीआय कुठल्या ठोस निर्णयावर पोहोचू शकेल हे समोर येईल. सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास करत असलेल्या सीबीआयने तपास सुरू केला. एक महिन्याच्या तपासानंतरही सीबीआयच्या हाती काहीचं विशेष असं लागलं नाही. या रिपोर्टमुळे सीबीआयला किती मदत होईल हे येणारा काळचं ठरवेल. विसरा तपासणीसाठी टॉक्सिकॉलॉजी व्यतिरिक्त हिस्टो पथोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट फोरन्सिक एक्स्पर्ट डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात येत आहे.


महत्वाच्या बातम्या :
Exclusive : सुशांतची डायरी माझाच्या हाती, सिगारेट सोडण्यापासून ते भविष्याबद्दल बरंच काही...


Web Exclusive : सुशांत 'या' अभिनेत्रींसोबत पवना डॅमवर पार्टीसाठी जायचा, बोट चालकाची NCB ला माहिती