यावेळी त्यांनी 21 वर्षांपूर्वीच्या आपल्या कृतीबद्दलही खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, ''21 वर्षांपूर्वी काही राजकीय पक्षांच्या आघाडीला समर्थन देऊन चूक केली. त्यावेळी राजकीय फायद्यासाठी माझ्या नावाचा वापर केला गेला, पण मी अद्याप कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही.''
ते पुढे म्हणाले की, ''परमेश्वरानं आपल्याला अभिनेता बनवलं. आणि मी माझ्या चाहत्यांना कधीही नाराज करणार नाही, असं वचन देतो.''
रजनीकांत यांनी 1996 च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांच्या विरोधात प्रचार केला होता. यामुळे या निवडणुकीत जयललिता यांचा दारुण पराभव झाल्याचं बोललं जातं.
दरम्यान, त्यांनी आपल्या चाहत्यांना सिगरेट आणि दारुपासून लांब राहण्याचंही आवाहन केलं. ते म्हणाले की, ''आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. सिगरेट आणि दारुच्या सेवनामुळे तुमचं आयुष्यच उद्ध्वस्त करु नका. त्याच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो असं नाही. तर त्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमताही कमकुवत बनते. मी स्वत: याचे दुष्परिणाम अनुभवले आहेत. त्यामुळे माझ्या म्हणण्याचा सर्वांनी गांभीर्यानं विचार करावा,'' असंही ते यावेळी म्हणाले.
जयललिता यांच्या निधनानंतर रजनीकांत राजकारणात प्रवेश करतील अशी अनेकांनी शक्यता व्यक्त केली होती. त्यातच रजनीकांत यांनी स्वत: राजकारणात प्रवेशाबाबत भाष्य केल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.