सनी लिओनीने प्रियंकाचं समर्थन करताना, ''जर पंतप्रधान मोदींना प्रियंकाच्या ड्रेसवरुन आक्षेप नव्हता. तर यावरुन इतका वाद का निर्माण केला जात आहे?'' असा प्रश्न टीकाकारांना विचारला आहे.
पत्रकारांशी बोलताना सनी म्हणाली की, ''आपण देशाच्या पंतप्रधानपदासाठी सर्वात स्मार्ट व्यक्तीची निवड केली आहे. जर त्यांना यावर आक्षेप असला असता, तर त्यांनी तो व्यक्त केला असता. पण त्यांनी यावर कोणताही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला यावरुन ट्रोल करण्याचा कुणालाही अधिकार नाही.''
सनी पुढे म्हणाली की, ''प्रियंका एक स्मार्ट महिला आहे. तिला समाजाविषयी चांगली जाण आहे. त्यामुळे तिच्या कामावरुन तिचं मुल्यांकन होण्याची गरज आहे. ना की, तिच्या कपड्यांवरुन.''
प्रियंका चोप्रा आपल्या आगामी बेवॉच सिनेमाच्या प्रमोशनसाठी जर्मनीत आहे. त्यातच पंतप्रधान मोदीही चार दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या निमित्त जर्मनीत असताना, मंगळवारी प्रियांका चोप्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची जर्मनीतल्या बर्लिनमध्ये भेट घेतली. यावेळी तिने वन पिस परिधान केला होता. या भेटीचा फोटो प्रियंकाने ट्विटरवर शेअर केल्यानंतर तिच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु होती.
दरम्यान, सोशल मीडियात आपले फोटो ट्रोल होत असल्याचे पाहून नेटीझन्सला प्रियंकानं प्रत्युत्तर दिलं होतं. इंस्टाग्रामवर तिनं आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर करुन प्रतिकात्मक संदेश दिला आहे. या फोटोतही तिने वन पिस परिधान केला होता.
संबंधित बातम्या
जर्मनीतील मोदी भेटीवेळीच्या प्रियंका चोप्राच्या ड्रेसवर चहूबाजूंनी टीका