मुंबई : अभिनेता ऋषी कपूर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. यावेळी कोणत्या वादग्रस्त विधानामुळे नाही तर त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे अडचणीत आले आहेत.


मुंबई महापालिकेने ऋषी कपूर यांच्याविरोधात खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

वांद्र्यातील पाली हिल्समध्ये असलेल्या कृष्णा राज बंगल्यातील वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त कापल्याने मुंबई महापालिकेने ऋषी कपूर यांना नोटीस पाठवली होती.

महापालिकेच्या एका अधिकऱ्याच्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांना झाडाच्या सहा फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. इमारच्या बांधकामात अडचणी येत असल्याने त्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु निरीक्षण केलं असता असं दिसलं की, झाडाच्या जास्त फांद्या कापल्या आहेत.

झाडाच्या फांद्या छाटायला परवानगी दिली होती. पंरतु परवानगीचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन झाडाच्या बळकट फांद्या कापल्या. हा महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण तसंच जतन (सुधारणा) अधिनियम 155 अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे ऋषी कपूर आणि कंत्राटदारांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी विचारणा करत ऋषी कपूर यांना उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली होती.

पण कोणतंही उत्तर न आल्याने ऋषी कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


संबंधित बातमी


अभिनेता ऋषी कपूर यांना मुंबई महापालिकेची नोटीस