नवी दिल्ली : नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अर्जुन पटियाला' या सिनेमामुळे दिल्लीत राहणाऱ्या एका तरुणाचं जगणं कठीण झालं आहे. या सिनेमात सनी लियोनी एक मोबाईल नंबर सांगते. यानंतरच या मोबाईल नंबरवर कॉल येणं सुरु झालं आहे. हा मोबाईल नंबर पुनीत अग्रवाल नावाच्या तरुणाचा आहे. आता परिस्थिती अशी आहे की, पुनीतच्या फोनवर दरदिवशी शंभर ते सव्वाशे कॉल येत आहेत.

रोहित जुगराज दिग्दर्शित 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात दलजीत दोसांज, क्रिती सेनन आणि वरुण शर्मा यांची प्रमुख भूमिका असून तो 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटात सनी लियोनीचीही भूमिका आहे. सिनेमातील एका सीनमध्ये सनी मोबाईलनंबर बोलते, हा नंबर दिल्लीतील तरुणाचा आहे.

पुनीतला 26 जुलैपासून फोन येण्यास सुरुवात झाली. शिवाय दररोज शंभर ते सव्वाशे कॉल त्याच्या फोनवर येतात. "कॉल करणारे माझ्याकडे सनी लियोनीबाबत विचारणा करतात. सनी लियोनीशी बोलणं करुन द्या, असं सांगितलं जातं," असं पुनीतने सांगितलं.

सिनेमात सनी लियोनीच्या तोंडी माझा मोबाईल नंबर
सिनेमात सनी आपलाच नंबर सांगत असल्याचं कसं लक्षात आलं, असं पुनीतला विचारलं असता तो म्हणाला की, "जेव्हा कॉल येण्यास सुरुवात झाली, तेव्हा मला का फोन करत आहात, असं मी विचारलं? त्यावेळी एका कॉलरने मला सिनेमातील एक क्लिप पाठवली. यानंतर मी 'अर्जुन पटियाला' नावाचा हा चित्रपट पाहून आलो. या चित्रपटाच्या सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये सनी लियोनी एक मोबाईल नंबर सांगते आणि हा नंबर माझाच आहे."

कॉलर्सचा कोणत्याही वेळी फोन
"सुरुवातीला कोणीतरी माझी थट्टा करतंय, असं वाटल्याने मीही तसाच रिअॅक्ट झालो. पण हा प्रकार दररोज घडू लागला आणि दरदिवशी 100 पेक्षा जास्त कॉल येऊ लागल्याने मला फारच त्रास होऊ लागला. मी ना खाऊ शकतो, ना पिऊ शकतो. सतत कॉल येत असतो. कॉलर कोणताही विचार न करता, कोणत्याही वेळी कॉल करतात, ज्या गोष्टीचा मला अतिशय त्रास होत आहे," असं पुनीत वैतागून सांगतो.

निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्रीविरोधात तक्रार
पुनीत अग्रवाल म्हणाला की, "मी यासंदर्भात 28 जुलै रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिंद्रा पार्क पोलिस स्टेशनच्या एसएचओलाही मी भेटलो होतो. त्यांनी मला कारवाईचं आश्वासन दिलं होतं. पण पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. मी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि माझा नंबर बोलणाऱ्या अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली आहे."

कोर्टात केस दाखल करणार
पोलिसांनी मला नंबर बदलण्याचा सल्ला दिला, जे शक्य नाही. मी जवळपास 10 ते 12 वर्षांपासून हा नंबर वापरत असून अनेक ठिकाणी हाच नंबर आहे. मी कोर्टात तक्रार करणार असून जेणेकरुन लवकरात लवकर सुनावणी होईल, असं पुनीत अग्रवालने सांगितलं.