मुंबई : बॉलिवूड अभिनेता राहुल बोसला पंजाबमधील एका हॉटेलमध्ये दोन केळींसाठी 442 रुपयांचे बिल आकारणे हॉटेलला चांगलेच महागात पडले आहे.  अभिनेता राहुल बोस नुकतेच चंदीगढमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने मागवलेल्या दोन केळींसाठी 442 रुपये बिल आकारले होते. या संदर्भात राहुलने एक व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली होती. यानंतर उत्पादन शुल्क आणि कर विभागाने CGST  सेक्शन 11 अंतर्गत JW Marriott हॉटेलला 25 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

अभिनेता राहुल बोस सध्या चंदीगडमध्ये शूटिंग करत आहे. तो तेथे एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या सुटमधे थांबला आहे. त्याने ट्विटरवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सांगत आहे की, हॉटेलमध्ये केवळ दोन केळी मागवल्यावर त्याला 442.50 रुपयांचे बिल सोपवले गेले.

राहुलने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, तो हॉटेलमध्ये जिमहुन जेव्हा आपल्या रूममध्ये परतला तेव्हा त्याने स्टाफ केळी आणण्याचे सांगितले. स्टाफने प्लेटमध्ये सजवून दोन केळी आणली आणि सोबतच या 'फूड प्लेटर' चे बिल दिले ज्यामध्ये जीएसटीसह दोन केळींची किंमत 442.50 रु. लिहिली होती. राहुल हे बिल पाहून हैराण झाला आणि त्याने व्हिडीओमध्ये सांगितले, 'हे माझ्यासाठी जरा जास्तच चांगले ठरले आहे.'

राहुलने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियात चांगलाच वायरल झाला. यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हॉटेलला 25 हजारांचा दंड ठोठावला.