मुंबई : तनुश्री दत्ताने गैरवर्तनाचा आरोपानंतर दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आपणहून 'हाऊसफुल्ल 4' हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. नानांच्या जागी प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.


अनिल कपूर आणि संजय दत्त या दोघांपैकी एकाची या व्यक्तिरेखेसाठी निवड होण्याची शक्यता आहे. मात्र संजय दत्त इतर चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे अनिल कपूरच ही भूमिका साकारण्याची शक्यता अधिक आहे. नाना आणि अनिल यांनी यापूर्वी 'वेलकम' चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर निर्माण झालेल्या वादाचा फटका सिनेमाला बसू नये यासाठी नाना पाटेकर यांनी सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं मुलगा मल्हार पाटेकरने स्पष्ट केलं होतं.

'सध्या सुरु असलेल्या वादामुळे कोणालाही अडचण निर्माण होऊ नये आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, तसेच चुकीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाचा फटका सिनेमाला बसू नये यासाठी त्यांनी हाऊसफुल्ल 4 सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे' असं मल्हार पाटेकरने सांगितलं.

याआधी,  बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने 'हाऊसफुल्ल 4' चं चित्रीकरण रद्द केलं होतं. सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खानवरही लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यामुळे अक्षयने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याजागी फरहाद सामजी दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

तपास पूर्ण होईपर्यंत हाऊसफुल्ल 4 चित्रपटाचं शूटिंग रद्द करण्याची विनंती मी निर्मात्यांना केली आहे. अशा आरोपांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जो दोषी सिद्ध होईल, त्याच्यासोबत मी काम करणार नाही. ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत, त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळाला हवा, असं अक्षय म्हणाला होता.