बंगळुरु : शूटिंगसाठी लोकेशन पाहताना पाय घसरुन धबधब्यात पडल्यामुळे सिने दिग्दर्शकाला प्राण गमवावे लागले. 36 वर्षीय कन्नड दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा मंगळुरुत मृत्यू झाला.
संतोष आपल्या चित्रपटातील चार क्रू मेंबर्ससोबत मंगळुरुतील इरमई धबधब्याजवळ गेले होते. आगामी चित्रपटाच्या लोकेशनची पाहणी करत संतोष फोटोशूट करत होते. फोटोशूट करताना संतोष यांनी रोबोचा कॉश्च्यूम घातल्याची माहिती आहे. त्यावेळी पाय घसरुन ते धबधब्यात पडले.
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतल्यानंतर काही तासांनी संतोष यांचा मृतदेह सापडला. क्रूविरोधात कलम 304 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
मंगळुरुमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे इरमई धबधबा भरभरुन वाहत आहे. स्थानिकांनी संतोष आणि क्रू मेंबर्सना सावधतेचा इशारा देऊनही त्याकडे सर्वांनी कानाडोळा केल्याचं म्हटलं जातं.
संतोष शेट्टी दिग्दर्शित 'कनासू कन्नू तेरेदागा' या 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.