मुंबई : अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील नात्याबद्दल फक्त बॉलिवूडच नाही, तर सर्व चाहत्यांनाही पूर्ण जाणीव आहे. सलमान आणि ऐश्वर्याही एकमेकांसमोर येणं टाळत असले तरी सल्लूच्या मनात जुन्या आठवणी कुठेतरी आहेत का, अशी शंका निर्माण होणाऱ्या घटना अनेकदा समोर येत असतात. आता सुलतानच्या निमित्ताने ही शंका पुन्हा नव्याने डोकं वर काढत आहे.

 
सलमान खान सध्या बुडापेस्टमध्ये 'सुलतान' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. त्यानिमित्ताने बुडापेस्टमधील शेचेन्यी ब्रिजवर सलमान आला होता. याच ब्रिजवर हम दिल दे चुके सनम चित्रपटातील शेवटच्या सीनचं शूटिंग झालं होतं. त्यामध्ये ऐश्वर्या धावत जाऊन अजय देवगनच्या खांद्यात विसावते. मात्र 'सुलतान'च्या निमित्ताने याच शेचेन्यी ब्रिजवरील एक फोटो पोस्ट केला आहे.

 

 



 
या ब्रिजवर सुलतान चित्रपटातील सीनचं शूटिंग झालं आहे का, याबद्दल अद्याप माहिती नसली तरी त्यानिमित्ताने ऐश्वर्यासोबतच्या 'त्या' सीनची सलमानला आठवण होणं साहजिक आहे. त्यामुळे 17 वर्ष जुन्या या सीनची पुनरावृत्ती होणार का प्रश्न दोघांच्याही चाहत्यांच्या मनात आहे.


 



 

 

सलमानसोबत काम करणार का? ऐश्वर्याला थेट सवाल


 

 

निर्माते वाशू भगनानी यांच्या कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत एकाने 'भविष्यात सलमानसोबत काम करणार का?' असा प्रश्न ऐश्वर्या राय बच्चनला विचारला. मात्र पत्रकाराच्या आगाऊ प्रश्नामुळे ऐश्वर्याचा पारा चांगलाच चढला.

 
ऐश्वर्याने हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम तात्काळ थांबवला. इतकंच नाही, तर या प्रश्नाचं आणि त्यानंतर तिने फणकारल्याचं झालेलं व्हिडिओ शूट डिलीट करण्याचा इशाराही तिने दिला. वाशूंचा मुलगा, अभिनेता जॅकी भगनानीने या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र ऐश्वर्या इतकी चिडली होती, की तिने सर्व पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचं 'स्पॉटबॉय.कॉम'च्या वृत्तात म्हटलं होतं.

 
विशेष म्हणजे रिओ ऑलिम्पिकसाठी सलमानच्या गुडविल अॅम्बेसेडर म्हणून झालेल्या निवडीवर ऐश्वर्याने अप्रत्यक्ष समर्थन दर्शवलं होतं. अनेक स्तरातून सलमानवर टीकेची झोड उठली असताना ऐश्वर्याच्या पाठिंब्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं.

 
“जर एखादी व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगलं करत असेल आणि कुणाला देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची इच्छा असेल, तर मग क्रीडा क्षेत्र असो, संगीत असो किंवा कला, अशा व्यक्तींचं स्वागतच करायला हवं.” असं मत तिने व्यक्त केलं होतं. त्यामुळे पुन्हा दोघं एकत्र काम करण्याची शक्यता निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.