Kamal Kishore Mishra: पत्नीला कारने धडक देऊन, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा (Kamal Kishore Mishra) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांनी चित्रपट निर्मात्याविरुद्ध भादंवि कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत त्यांच्या पत्नीच्या डोक्याला मार लागला असून, त्या गंभीर जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी निर्मात्या  विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  


कमल मिश्रा यांनी 19 ऑक्टोबर रोजी पत्नीला कारने धडक दिली होती. या कार धडकेत त्यांच्या पत्नी यास्मिन मिश्रा गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांनी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. कमल यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अद्याप चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


नेमकं काय घडलं?


मीडिया रिपोर्टनुसार, कमल किशोर मिश्रा (Kamal Kishore Mishra) यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलेय की, 19 ऑक्टोबरला त्यांनी आपल्या पतीला एक दुसऱ्या महिलेसोबत गाडीतून जाताना पाहिले. दोघांना गाडीत एकत्र पाहून कमल यांच्या पत्नीने कारची काच ठोठावली. मात्र, कमल यांनी यास्मिन यांच्याकडे दुर्लक्ष करत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या पत्नीने गाडी थांबण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गाडीने थेट यास्मिन यांना धडक दिली. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली.    


   






कोण आहेत कमल किशोर मिश्रा?


चित्रपट निर्माते असणारे कमल किशोर मिश्रा ‘वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन’ नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवतात. त्यांनी ‘देहाती डिस्को’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटामध्ये गणेश आचार्य, राजेश शर्मा, मनोज जोशी, रवी किशन असे कलाकार झळकले होते. याशिवाय त्यांनी ‘शर्मा जी की लग गई’, ‘फ्लॅट नंबर 420’, ‘भूतियापा’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.


निर्माते कमल किशोर मिश्रा (Kamal Kishore Mishra) यांनी 'खल्ली बल्ली' या चित्रपटाची निर्मितीही केली होती. त्यांचा हा चित्रपट याच वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, राजपाल यादव, हेमंत पांडे, विजय राज, रजनीश दुग्गल, किनायत अरोरा यांसारखे कलाकार झळकले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज शर्मा यांनी केले होते. कमल किशोर मिश्रा यांनी 2019मध्ये निर्माती क्षेत्रात पदार्पण केले. कमल किशोर मिश्रा हे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असून, त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.   


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 27 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!