मुंबई : 'नाळ' या चित्रपटाची कथा काही प्रमाणात माझ्या आयुष्याशी मिळती-जुळती आहे. कारण 'नाळ'मधल्या 'चैत्या'प्रमाणे (चैतन्य - चित्रपटातलं मुख्य पात्र) मलादेखील दत्तक दिलं होतं. अशी माहिती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली. 'कोण होणार मराठी करोडपती' आणि 'झुंड' या नागराजने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने नागराज एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी नागराजने त्याच्या आयुष्याचे काही पैलू उलगडले.

नागराज म्हणाला की, 'नाळ'ची कथा काही प्रमाणात माझ्या आयुष्याशी मिळती-जुळती आहे. मलादेखील माझ्या पालकांनी दत्तक दिलं होतं. परंतु मला हे खूप उशीरा समजलं. तसेच 'नाळ'मधल्या 'चैत्या'प्रमाणे मला असं अचानक समजलं नाही. मला त्याचा मोठा धक्का बसला नाही. मला जेव्हा हे समजलं तेव्हा मी 'चैत्या'पेक्षा थोडा मोठा होतो. तिसरी चौथीत असताना मला समजलं की मी मला दत्तक दिलं आहे.

'नाळ'ची कथा आणि माझी गोष्ट एकमेकींशी साधर्म्य राखत असली तरी त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे. 'नाळ'ची गोष्ट ही माझी गोष्ट नाही. 'नाळ'चा दिग्दर्शक सुधाकर यंकट्टीने जेव्हा मला ही गोष्टी सांगितली तेव्हा मी त्याला म्हणालो की, ही गोष्ट मी लिहायला हवी होती. परंतु मी माझी गोष्ट लिहिली असती तर ती खूप वेगळी असती.

व्हिडीओ पाहा



दरम्यान, नागराजने त्याच्या 'कोण होईल मराठी करोडपती?' या रियलिटी शोमधील त्याच्या नव्या स्टाईलविषयीसुद्धा माहिती दिली. नागराज म्हणाला की, मी या शोमध्ये स्मार्ट दिसतोय, आयुष्यात पहिल्यांदाच मी मोठ्या पार्लरमध्ये जाऊन केस कापले. मी आमचा स्टायलिस्ट आणि डिझायनरने जे काही सांगितलं आहे, ते फॉलो करतोय. मी या शोमुळे पहिल्यांदा चांगलं दिसणं आणि राहण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या शोमुळे आपलं वाचन कमी झाल्याची खंतदेखील त्याने व्यक्त केली.

नागराज पहिलाच हिंदी चित्रपट करतोय. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन असणार आहेत. अमिताभबद्दल नागराज म्हणाला की, अमिताभ हे मोठे गारुड असलेले अभिनेते आहेत. खूप मोठे कलावंत आहेत. खूम कमी अभिनेते असे असतात, ज्यांना स्टारडम मिळतं अमिताभ त्यापैकीच एक आहेत.