वॉशिंग्टन : कलाकारांनी न्याय्य गोष्टींसाठी व्यक्त झालं पाहिजे, असे म्हटले जाते. मात्र सर्वत्र ते होताना दिसत नाही. कारण राजकारण्यांच्या विरोधात जाण्यास कुणी धजावत नाही. मात्र अमेरिकन गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेता स्टीव्हन टेलर यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच खडे बोल सुनावले आहेत.


मंगळवारी (21 ऑगस्ट) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी त्यांच्या एका राजकीय सभेत ‘लिव्हिन ऑन द एज’ या गाण्याचा वापर केला. स्टीव्हन टेलर हे या गाण्याचे सह-गीतकार आहेत. स्टीव्हन टेलर, जो पेरी आणि मार्क हड्सन यांनी एकत्रितपणे हे गाणं लिहिलं आहे.

यासंदर्भात स्टीव्हन टेलर यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून, त्यांच्याकडून यासंदर्भात येत्या 24 तासात उत्तराची विनंती केली आहे.

स्टीव्हन टेलर यांनी यासंदर्भात ट्वीटमध्ये म्हटले की, “हे काही रिपब्लिकन्स किंवा डेमोक्रॅट्समधील राजकीय युद्ध नाही. मी कुणालाही माझी गाणी माझ्या परवानगीशिवाय वाजवण्यासाठी देत नाही. आणि माझी गाणी कुठल्या राजकीय अभियान किंवा सभांसाठी नाहीत.”


तसेच, स्टीव्हन पुढे म्हणाले, “अशाप्रकारे गाण्यांचा वापर होतो म्हणूनच कॉपिराईट्स आणि गीतकारांच्यां हक्कांसाठी मी याआधीच्या सरकारशीही लढत आलोय. शिवाय, म्हणूनच मी ‘म्युझिक मॉडर्निझायशन’ या कायद्यासाठी सिनेटकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.”

विशेष म्हणजे, 2015 सालीही स्टीव्हन टेलर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना अशीच कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यावेळी ‘ड्रम ऑन’ या गाण्याचा वापर डोनाल्ड ट्रम्प यांनी राजकीय अभियानासाठी केला होता. तीन वर्षांनतर पुन्हा स्टीव्हन टेलर यांच्याच गाण्याचा वापर ट्रम्प यांनी केला असून, पुन्हा टेलर यांनी ट्रम्पना नोटीस पाठवली. आता ट्रम्प काय उत्तर देतात, याकडे स्टीव्हन टेलर यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

स्टीव्हन टेलर कोण आहेत?

स्टीव्हन टेलर (वय 70 वर्षे) हे अमेरिकेतील लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेते आहेत. त्यांनी टेलिव्हिजनवरील एका गाण्यांच्या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. 'अॅरोस्मिथ' नावाच्या रॉक बँडसोबत ते जोडले गेले आहेत. या रॉक बँडचे ते सर्वेसर्वाच आहेत. हे रॉक बँड अमेरिकेत प्रचंड प्रसिद्ध आहे.